IPL 2027: आयपीएल 2027 पूर्वी एमएस धोनीबाबत मोठी अपडेट समोर! इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्यास दिला नकार

आयपीएल (IPL) 2027 स्पर्धा सुरू होण्यास अजून वेळ आहे, पण स्पर्धेबाबतच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. यादरम्यान सीएसकेचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनीबाबत (MS Dhoni) एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. धोनीने स्वतः आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player) म्हणून खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे, अशी माहिती त्याचे माजी सहकारी आणि खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी दिली आहे.

सीएसकेचे माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramanym Badrinath on MS Dhoni’s future in IPL 2027) यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितले की, धोनीसोबत झालेल्या संभाषणात त्याने स्पष्ट केले होते की, त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळायचे नाही. धोनी स्वतःला पूर्णवेळ यष्टीरक्षक (wicket keeper) मानतो आणि जर तो खेळणार असेल, तर तो मैदानावर पूर्ण 20 षटके उपस्थित राहू इच्छितो.

एमएस धोनीने आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये एकही सामना खेळलेला नाही. तो पूर्ण हंगाम संघासोबत होता, पण पायाच्या दुखापतीमुळे मैदानावर उतरू शकला नाही. संपूर्ण हंगाम चाहत्यांना फक्त वाटच पहावी लागली. त्यावेळी अशी चर्चा होती की, धोनी पूर्णपणे फिट नसला तरी तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नक्कीच खेळू शकतो.

बद्रीनाथ यांना मात्र असे वाटते की, धोनीने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळल्यास संघाला फायदा होऊ शकतो. कारण आता धोनीसाठी खूप वेळ मैदानावर राहणे शक्य वाटत नाही. तसेही तो शेवटच्या काही षटकांत फलंदाजीसाठी येतो, त्यामुळे नवीन भूमिकेत असणे त्याच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.

यादरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम राहणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. हा नियम असावा की नको हे ठरवण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) सर्व फ्रँचायझींना पत्र लिहून त्यांची मते मागवली आहेत. यापूर्वीही काही खेळाडू आणि संघांनी या नियमाविरुद्ध आवाज उठवला होता. त्यामुळे यावर अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Comments are closed.