आम आदमी पक्षात मोठी फूट

राघव चड्ढांसह सात खासदार भाजपच्या गळाला : अरविंद केजरीवालांना मोठा धक्का

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चंदीगड

राज्यसभा सदस्य राघव चड्ढा आणि संदीप पाठक यांच्यासह आम आदमी पक्षाच्या (आप) सात खासदारांनी शुक्रवार, 24 एप्रिल, 2026 रोजी पक्ष सोडण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा आपला इरादाही जाहीर केला. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी राघव चड्ढा यांच्या जागी राज्यसभेचे उपनेते म्हणून नियुक्त केलेले अशोक मित्तल यांनीही ‘आप’ची साथ सोडली आहे. त्यांनी सर्वांची स्वाक्षरी केलेले पत्र आणि कागदपत्रे राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सादर केली आहेत. ‘आप’ सोडलेल्या सात खासदारांमध्ये राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोककुमार मित्तल, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंग साहनी यांचा समावेश आहे.

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली आहे. त्यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे टोकाचे पाऊल उचलणारे राघव चड्ढा एकटे नाहीत. सुरुवातीला इतर तीन खासदारांनीही आम आदमी पक्ष सोडल्याची घोषणा केली. यामध्ये राघव चड्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांचा समावेश होता. याचदरम्यान ‘आप’चे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त राज्यसभा खासदार आमच्यासोबत असल्याचे संकेत देत त्यांनी आधीच राजीनामापत्रावर स्वाक्षरी केल्याचे संकेतही चड्ढा यांनी दिले. दिवसअखेरीस हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी आणि अशोक मित्तल यांच्यासह अनेक नेते राघव चड्ढा यांच्यासोबत भाजपच्या गळाला लागल्याचे स्पष्ट झाले.

आता ‘आप’कडे केवळ 3 खासदार

आम आदमी पार्टीचे एकूण 10 खासदार आहेत, त्यापैकी सात पंजाबचे आणि तीन दिल्लीचे आहेत. परिणामी, सात खासदारांचे एकाचवेळी पक्ष सोडणे हा ‘आप’साठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षांतरामुळे अरविंद केजरीवाल यांच्या राज्यसभेतील सदस्यसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे. या मोठ्या फुटीमुळे आम आदमी पक्षाच्या भविष्याबद्दल आणि त्याच्या संघटनात्मक एकतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ‘आप’चे राज्यसभेत फक्त तीन खासदार उरले आहेत. यामध्ये संजय सिंग (दिल्ली), एन. डी. गुप्ता (दिल्ली) आणि जल कार्यकर्ते बलबीर सिंग सिचेवाल (पंजाब) यांचा समावेश आहे.

पक्षांतरबंदी कायद्याचा परिणाम ‘शून्य’

राघव चड्ढा यांनी ‘आप’चे दोन-तृतीयांश राज्यसभा खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार या खासदारांच्या सदस्यत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या हे एक कायदेशीर विलीनीकरण मानले जाईल. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार राघव चड्ढा यांनी ‘आप’वर अनेक आरोप केले. आम्ही, म्हणजेच राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानाच्या तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापूर्वी, दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वाती मालीवाल यांनीही बंड केले होते.

आप आपल्या तत्त्वांपासून भरकटली : चड्ढा

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. ज्या ‘आप’ला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले आणि माझ्या तारुण्याची 15 वर्षे समर्पित केली, ती आता आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटली आहे. आता हा पक्ष देशाच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करतो. गेल्या काही वर्षांपासून माझ्यासारखी योग्य व्यक्ती चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव होत होती. त्यामुळे आज मी ‘आप’पासून वेगळा होत जनतेच्या अधिक जवळ जात आहे, अशी घोषणा चड्ढा यांनी केली.

…हा पंजाबी जनतेचा अपमान : केजरीवाल

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राघव चड्ढांच्या राजीनाम्याला पंजाबचा अपमान म्हटले आहे. भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला ‘धक्का’ देण्याचे काम केले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली. त्यांनी या संपूर्ण घटनेला पंजाबच्या जनादेशाविरुद्धचा कट असल्याचे म्हटले आहे. भाजपला पंजाबच्या प्रगतीचा हेवा वाटतो आणि म्हणूनच तेथील नेत्यांमध्ये फूट पाडून राज्याच्या विकासात अडथळा आणू इच्छित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

'ऑपरेशन लोटस' सक्रिय : संजय सिंह

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले असून पंजाब सरकारला अस्थिर करण्यासाठी आणि भगवंत मान यांची विकासकामे थांबवण्यासाठी एक घृणास्पद कट रचला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या (ईडी-सीबीआय) माध्यमातून दबाव आणून खासदारांना फोडण्यात आले. पंजाबची जनता या विश्वासघातासाठी आणि घाणेरड्या राजकारणासाठी भाजप आणि त्यांच्या गद्दारांना कधीही माफ करणार नाही, असेही संजय सिंह म्हणाले.

भाजपमध्ये सामील होणारे खासदार

  1. राघव चढ्ढा
  2. स्वाती मालीवाल
  3. संदीप पाठक
  4. हरभजन सिंग
  5. राजिंदर गुप्ता
  6. विक्रमजित सिंग साहनी
  7. अशोक कुमार मित्तल

Comments are closed.