विराट कोहलीचा भीमपराक्रम, आयपीएल इतिहासात असा कारनामा करणारा पहिला खेळाडू!
जेव्हा जेव्हा विराट कोहली मैदानात उतरतो, तेव्हा त्याचे लक्ष नेहमीच एखाद्या विक्रमावर असते. सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या विराटने, या हंगामातील 34व्या सामन्यादरम्यान एक मोठा टप्पा गाठला आहे. आयपीएलच्या इतिहासात 800 चौकार ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केवळ विराटच्याच नावावर आहे. शिवाय, याच डावादरम्यान एक षटकार ठोकून त्याने आपल्या आय़पीएल कारकिर्दीतील 300 षटकारांचा टप्पाही पूर्ण केला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांचा जेव्हा विषय निघतो, तेव्हा या यादीत विराट कोहली सर्वात अव्वल स्थानी विराजमान आहे. आतापर्यंत, त्याने 274 सामन्यांमध्ये एकूण 803 चौकार मारले आहेत. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर माजी फलंदाज शिखर धवन आहे, ज्याने 222 सामन्यांमध्ये 768 चौकार मारले आहेत. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर 663 चौकारांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत रोहित शर्माचाही समावेश असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 276 सामन्यांमध्ये 653 चौकार मारले आहेत. या अव्वल पाच फलंदाजांच्या यादीत शेवटचे स्थान अजिंक्य रहाणेचे आहे, ज्याने 205 सामन्यांमध्ये 522 चौकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
विराट कोहली: 803* चौकार
शिखर धवन: 768 चौकार
डेव्हिड वॉर्नर: 663 चौकार
रोहित शर्मा: 653 चौकार
अजिंक्य रहाणे: 522 चौकार
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान एक षटकार ठोकून, कोहलीने आयपीएलमधील 300 षटकारांचा महत्त्वाचा टप्पा गाठला. असे करताना, ही कामगिरी करणारा तो केवळ तिसराच फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 142 सामन्यांमध्ये 357 षटकार ठोकले होते. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 276 सामन्यांमध्ये 310 षटकार मारले आहेत. दरम्यान, विराट कोहलीने 274 सामन्यांमध्ये 300 षटकार पूर्ण केले असून, या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
ख्रिस गेल: 357 षटकार
रोहित शर्मा: 310 षटकार
विराट कोहली: 300 षटकार
एम.एस. धोनी: 264 षटकार
एबी डिव्हिलियर्स: 251 षटकार
Comments are closed.