RCB vs GT: विराट-पडिक्कलचा झंझावात, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव, आरसीबीचा विजयी पंजा
आयपीएलच्या 19व्या हंगामातील 34वा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक लढतीत, गतविजेत्या आरसीबी संघाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत गुजरात टायटन्सवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला.
गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत, संघाने 20 षटकांत 3 विकेट गमावून एकूण 205 धावा उभारल्या. सलामीवीर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भक्कम भागीदारी रचली. शुूबमन गिल 32 धावांवर बाद झाला. मात्र, साई सुदर्शनने आपला खेळ सुरूच ठेवत एक अप्रतिम शतक झळकावले आणि केवळ 58 चेंडूंत 100 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. या दोघांच्या योगदानामुळेच गुजरातला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. आरसीबीकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आऱसीबीची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. संघाची धावसंख्या अवघी 24 असतानाच त्यांनी आपला पहिला गडी गमावला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी एक जबरदस्त भागीदारी रचली, ज्यामुळे सामन्याचे पारडे पूर्णपणे आऱसीबीच्या बाजूने झुकले. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केवळ 59 चेंडूंत 155 धावांची आक्रमक भागीदारी केली आणि गुजरातच्या गोलंदाजांवर प्रचंड दडपण निर्माण केले.
देवदत्त पडिक्कलने 55 धावांचे योगदान दिले, तर विराट कोहलीने अत्यंत संयमी आणि अनुभवी खेळी साकारत 81 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर, आरसीबीने हे लक्ष्य सहजपणे गाठले. गुजरातकडून रशीद खानने 2 गडी बाद केले, तर मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Comments are closed.