भाजपचे अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशवीयांना संबोधित करताना महत्त्वाचे आवाहन केले. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करावा, खाद्यतेलाचाही वापर कमी करावा, असे सूचवले आहे. तसेच, सार्वजनिक वाहने, शहरात मुख्यत्वे: मेट्रोला प्राधान्य देण्याचेही मोदींनी सांगितले. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई भाजपच्या अध्यक्षांनाच मोदींच्या या आवाहनाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा एकामागून एक धावत असल्याचं दिसून आलं. त्यावरुन, आता विरोधकांनी टीका केली आहे. आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केलीय.
मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत आज सकाळीच नालेसफाईच्या कामासाठी पाहणी दौरा केला. यावेळी, त्यांच्या स्वतःसाठीच्या दोन गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालेकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 25 गाड्यांचा ताफा संपूर्ण मुंबई उपनगरात फिरत असल्याचं दिसून आलं. त्यांच्या ताफ्यासोबत मोठा लवाजमाही पाहायला मिळाला, याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. एकीकडे भाजपचे शिर्ष तथा पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी वाहनांच्या वापरासंबंधीत देशाला आवाहन केलेलं असताना भाजप नेत्यांकडूनच असा लवाजमा आणि गाड्यांचा ताफा घेऊन पाहणी होत असल्याचा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.
रोहित पवार यांचा टोला
पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद. कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात. भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशीच झालीय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरेंचीही टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावरही आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. आपण सगळेच पहिल्या दिवसापासून बोलत आहोत की, आजच्या परिस्थितीवर त्यांनी बोलावं. आता 5 राज्यातील निवडणूक झाल्यावर ते बोलत आहेत, त्यांच्या मंत्र्यांचा ताफा कमी करणार आहात का? जनतेने सर्व काही करावं तर सरकारने काय करावे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर, अमित साटम यांनी 25 गाड्यांचा ताफा घेऊन पाहणी केली. त्यावरुन, आदित्य ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. स्वतः सोबत 25 गाड्या आणि कचरा काढणाऱ्या गाड्या किती? असा सवाल आदित्य यांनी विचारला. तसेच, यांना सगळ्या परवानगी दिल्लीतून घ्याव्या लागतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटीवरुनही आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली, गेल्या दशकात अनेक पेपर फुटले जात आहेत, असे त्यांनी म्हटलं.
हेही वाचा
नाशिक ते हरियाणा…. NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
आणखी वाचा
Comments are closed.