आधी कार्यकर्ते बना, मग नेतेगिरी करा, भाजपकडून राज्यात आगळा वेगळा प्रयोग; कार्यकर्त्यांना सक्तीन
भाजप: ‘नेतेगिरी करण्याआधी कार्यकर्ता बना’ हा ठाम संदेश देत भारतीय जनता पक्षाने (BJP) कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी सक्तीचे प्रशिक्षण महाअभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय भाजपने यंदाचे वर्ष ‘प्रशिक्षण वर्ष’ म्हणून जाहीर केले असून, पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि बाहेरून आलेल्या नेत्यांनाही प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. या महाअभियानाची महाराष्ट्रात सुरुवात 20 फेब्रुवारीपासून होणार आहे.
या महाअभियानाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रशिक्षण अभियान यशस्वी होते की नाही, याकडे त्यांचे विशेष लक्ष असणार आहे. पश्चिम विभागासाठी (गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, मध्य प्रदेश व छत्तीसगड) गुजरातचे माजी खासदार के. सी. पटेल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
BJP: ‘आधी कार्यकर्ता बना’ हाच प्रशिक्षणाचा गाभा
नेतृत्व जरूर करा, मात्र त्याआधी भाजपचा विचार समजून घेऊन तो आचरणात आणा, हाच या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. मूळ भाजप कार्यकर्ता, सध्याचे नेते तसेच पक्षात नव्याने आलेले सर्वांनाच प्रशिक्षण सक्तीचे असेल. पुढील 5 ते 25 वर्षांसाठी वैचारिकदृष्ट्या सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे या महाअभियानाचे प्रमुख ध्येय आहे. ‘व्यक्ती निर्माणातून संघटन निर्माण आणि संघटन निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ ही प्रशिक्षणाची मध्यवर्ती संकल्पना असेल. राज्यातील भाजपच्या सर्व 1,223 मंडळांमध्ये प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
BJP: प्रचाराच्या आधुनिक साधनांचे प्रशिक्षण
भाजपचा कार्यकर्ता किंवा नेता हा पक्षाच्या विचारधारेपासून ढळता कामा नये, तसेच तो विचार आधुनिक पद्धतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचवता यावा, यासाठी प्रशिक्षणात आधुनिक प्रचार साधनांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये पीपीटी सादरीकरण, सोशल मीडियासाठी रील तयार करणे, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मंडळापासून प्रदेश स्तरावर प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्यांचे प्रशिक्षण आधी होईल, त्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी शिबिरे घेतली जातील. प्रशिक्षणार्थींकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
BJP: महाराष्ट्रात 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ
महाराष्ट्रातील महाअभियानाची औपचारिक सुरुवात 20 फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या बैठकीने होईल. या बैठकीला भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, 14 प्रदेश प्रशिक्षक आणि जिल्हा प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत. 24 फेब्रुवारीला केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय बैठक होणार आहे. त्यानंतर वर्षभर प्रदेश, जिल्हा आणि मंडळ पातळीवर निवासी प्रशिक्षण वर्ग घेतले जातील. फक्त शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
BJP: प्रशिक्षणात काय शिकवले जाणार?
या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पक्षाची वैचारिक बांधिलकी, कार्यपद्धती, कार्यकर्त्यांचे वर्तन, भाजपचा इतिहास व विकास, समाजाप्रती संवेदनशीलता, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आव्हाने, विविध मुद्द्यांवर पसरवले जाणारे ‘फेक नॅरेटिव्ह’ कसे खोडून काढायचे, सरकारच्या योजनांशी जनसामान्यांना कसे जोडायचे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण शिबिरांची ठिकाणे आलिशान नसावीत, भोजन साधे असावे आणि निवास व्यवस्थाही आलिशान नसेल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच, शिस्तबद्ध, वैचारिकदृष्ट्या सक्षम आणि आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करणारा कार्यकर्ता घडवण्यासाठी भाजपने हे महाअभियान हाती घेतले असून, ‘आधी कार्यकर्ता – मग नेते’ हा संदेश या प्रशिक्षणातून ठळकपणे दिला जाणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.