भाजप आमदार महेश बालदी यांना तीन वर्षे सश्रम कारावास; तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण, आईलाही शिवीगाळ
तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण व त्याच्या आईला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप आमदार महेश बालदी यांना अलिबागच्या दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी मारहाण प्रकरणात आमदार बालदी यांच्यासह चार जणांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत 65 हजार रुपयांची नुकसानभरपाई पीडित कुटुंबाला देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या शिक्षेमुळे आमदार महेश बालदी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
उरणमध्ये मुलीला पह्न करत असल्याच्या कारणावरून मयूर घरत या तरुणाला बंदुकीचा धाक दाखवत भाजप आमदार महेश बालदी, सुनील पेडणेकर, प्रवीण पेडणेकर व गणेश पाटील यांनी 4 मार्च 2010 रोजी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मयूर गंभीर जखमी झाला होता व त्याच्यावर 21 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी आमदार महेश बालदी यांच्यासह मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध आयपीसी कलम 325, 324, 323 आणि 506 (2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, तर मयूरच्या आईला आमदार बालदी यांनी शिवीगाळ केल्याने 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यावर अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी सुरू होती. मुख्य दंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी आज गुरुवारी या खटल्याचा निकाल जाहीर करत आमदार महेश बालदी व अन्य तिघांना दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच आरोपींना आर्थिक दंड ठोठावत या दंडाच्या रकमेतून मयूर घरत याला 50 हजार, त्याचे वडील काशीनाथ घरत यांना 10 हजार आणि आई नूतन घरत यांना पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले.
न्यायालयाचे निरीक्षण काय
सार्वजनिक ठिकाणी तरुणाला मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
आरोपी प्रतिष्ठत व्यक्ती आहेत किंवा त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल नाहीत, या कारणांवरून त्यांना प्रोबेशनचा लाभ देता येणार नाही.
Comments are closed.