गुटख्याप्रमाणे फटाक्यांवर बंदी हवी! हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
गुटख्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवरही बंदी असायला हवी. जेणेकरून विक्रीच झाली नाही तर लोक फटाकेच फोडणार नाहीत. याने प्रदूषणालाही आळा बसेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले.
प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला, अशी सर्वांचीच भूमिका असेल तर तशी बंदी घालायलाच हवी. महाराष्ट्रात फटाक्यांची निर्मिती केली तरी चालेल, पण येथे त्याची विक्रीच करू दिली जाणार नाही. फटाके बनवणाऱ्यांनी ते कुठेही विकावेत, असेही न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
आम्हाला लोकांच्या आरोग्याची काळजी आहे. शांततेत जीवन जगण्याच्या अधिकारावर गदा येऊ नये, असे आमचे मत आहे. त्यासाठी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालावी की नाही? दिवाळीत होणाऱ्या आतषबाजीवर कशा प्रकारे निर्बंध घालता येतील यावर आम्ही सविस्तर आदेश देऊ, असे नमूद करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.
दिवाळीत होणारे ध्वनी व वायू प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस, महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने खूप प्रयत्न केले. त्यांचे काwतुकच करायला हवे. पण एवढे करूनही यंत्रणा अपयशी ठरली. दिवाळीत मुंबईची हवा अगदीच खालावली होती. बंदी असूनही लोक रॉकेट उडवत होते. बेफाम फटाके वाजवत होते. या परिस्थितीत अख्खी यंत्रणा हतबल झाली होती, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. आम्ही अधिकृत फटाके विव्रेते आहोत. आमच्यावर कारवाई नको, अशी विनंती फटाके विव्रेत्यांनी केली. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. फटाक्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. लोकांचे जीव जात आहेत. मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे तुमची समाजाप्रति काही जबाबदारी आहे की नाही, असे न्यायालयाने फटकारले.
महत्वाची माहिती
संपूर्ण राज्यात शांतता क्षेत्रे अद्याप जाहीर केलेली नाहीत. याची कार्यवाही तत्काळ करावी. फटाके वाजवण्यासाठी प्रत्येक विभागात जागा निश्चित करावी. फटाक्यांवर पूर्णपणे बंदीच घालावी, अशा प्रकारच्या सूचना वकिलांकडून न्यायालयात करण्यात आल्या.
मराठमोळा दीपोत्सव मिहिर कोटेचा यांच्या अंगलट
मुलुंड येथील छत्रपती संभाजी राजे मैदानात आयोजित केलेला मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. 6 ते 8 नोव्हेंबरला हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाचेही उल्लंघन झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार यावर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती करणारा अर्ज अॅड. सागर देवरे यांनी दाखल केला. त्याची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करा, असे तोंडी आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले.
त्या लोकांची दिवाळी ‘ब्लॅक डे’ होती
फटाक्यांमुळे लोकांचा जीव गेला. मालमत्तेचे नुकसान झाले. दिवाळीत अशा प्रकारे अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी दिवाळी ब्लॅक डे होती, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.
लोक ऐकत का नाहीत?
प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. इतरांना त्रास होईल असे काही करू नका, असे आम्ही वारंवार सांगत आहोत. तरीही काही लोक ऐकतच नाहीत. इतर नागरिकांच्या आरोग्याची हानी झाली तरी काही लोक फटाके फोडायचे थांबत नाहीत. अगदी पहाटे तीन वाजेपर्यंत फटाके फोडले जात आहेत. याला कायदेशीर मार्गाने वेसण ही घालावीच लागेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
Comments are closed.