राजेंद्र भिंगे खून प्रकरण – गुजरातमधून तिघांना केली अटक, गुन्ह्यात पाच जणांचा समावेश
राजेंद्र दत्तात्रय भिंगे (वय ४३) यांचा राहत्या घराजवळ गोळ्या घालून खून केल्यानंतर पसार झालेल्या तिघांना अहमदाबाद – गुजरात येथून पोलिसांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी दोन जणांना अटक केली असल्याने एकूण संशयित आरोपींची संख्या पाचवर गेली आहे.
दि.१७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भिंगे हे जेवण करून घराजवळ शतपावली करीत असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी गोळ्या घालून त्यांचा खून केला होता. नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या खून प्रकरणात आरोपी म्हणून अनेक वर्षे जेलमध्ये राहिल्यानंतर निर्दोष मुक्तता झालेल्या राजेंद्र भिंगे यांच्यावर इतरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा असा थरारक खून करण्यात आल्याने शहरात तणावाचे वातावरण असून गँगवॉरची भिती व्यक्त केली जात आहे.
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढण्यात यश मिळविले आहे. यामध्ये तात्या ऊर्फ प्रविण देविदास शिंदे (रा. झेंडेगल्ली) याला बुधवारी (दि.१८) अटक करण्यात आली. त्यानंतर अनिकेत गवळी याला गुरूवारी (दि.१९) ताब्यात घेण्यात यश आले.
दरम्यान, यातील मुख्य संशयित असलेले वैभव ज्ञानेश्वर फसलकर (रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर), स्वप्नील अहिरे (रा.पंढरपूर) आणि रोहन नागे (रा.हडपसर) हे तिघे हल्ल्याच्या घटनेनंतर रातोरात गुजरातमध्ये पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार माग काढत पोलीस पथके गुजरामध्ये पोहोचली. अखेर गुरूवारी तिघांनाही तेथे ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. अहमदाबाद येथील न्यायालयात हजर करून परवानगीनंतर तिघांनाही पंढरपुरात आणण्यात येणार आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकूण आरोपींची संख्या आता ५ झाली आहे. खुनाच्या गुन्ह्याची उकल करणारे धागेदोरे हाती लागल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. सर्व ५ आरोपी पोलीस कोठडीत एकत्र आणल्यानंतर त्यांनी भिंगे यांचा खून नेमका कशासाठी केला ? याची उकल होणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्यासह अन्य अधिकारी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कसून तपास करीत आहेत.
Comments are closed.