वालोपे येथील तरुणाच्या निर्घृण खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची दहा पथके; मोबाईल आणि दुचाकी वापरत नसल्याने तपासासमोर मोठे आव्हान
चिपळूण-वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी पहाटे एका तरुणाची डोक्यात जांभा दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. नवनाथ बबन कांबळे (वय ३२, रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तब्बल दहा स्वतंत्र तपास पथके तैनात केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून विविध भागांत कसून शोध घेतला जात असून, हत्येमागील सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वालोपे येथील झोलाई माऊली पार्क इमारतीसमोरील एका टपरीच्या पाठीमागे नवनाथ कांबळे याचा मृतदेह आढळून आला होता. तो वालोपे येथे कोकण रेल्वेत कार्यरत असलेले त्याचे मेहुणे विकास गायकवाड यांच्याकडे वास्तव्यास होता आणि लोटे येथील एका खासगी कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करत होता. नवनाथ हा विवाहित होता, मात्र चार वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने घटस्फोट घेतला होता. यानंतर त्याला दारूचे प्रचंड व्यसन लागल्याचे समोर आले असून, याच व्यसनातून किंवा त्यातून उद्भवलेल्या वादातून त्याचा घात झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी आतापर्यंत नवनाथच्या कामावरील ठेकेदार, सहकारी कामगार आणि अन्य काही संशयित व्यक्तींकडे कसून चौकशी केली आहे, तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, मयत नवनाथ हा मोबाईल फोन किंवा दुचाकीचा वापर करत नसल्यामुळे त्याचे मित्र कोण होते, तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याची कोणाशी उठबस होती, याचा तांत्रिक माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. असे असले तरी, दहा पथकांच्या माध्यमातून विविध दिशांनी तपास तीव्र करण्यात आला असून, खून होण्यामागील नेमके कारण स्पष्ट होताच लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलीस यंत्रणेने व्यक्त केला आहे.
Comments are closed.