Ratnagiri News – शास्त्री नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘नाम फाउंडेशन’ सरसावले, 20 ते 25 गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
संगमेश्वर तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी शास्त्री नदी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळाने भरली आहे. त्यामुळे नदीची पाणी साठवण क्षमता कमी होऊन भविष्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शास्त्री नदी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत नदीच्या पुनरुज्जीवनासाठी नामांकित ‘नाम फाउंडेशन’कडे मदतीची आर्त साद घातली. या सादेला सकारात्मक प्रतिसाद देत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शास्त्री नदीतील गाळ उपसा आणि बंधारा बांधणीच्या महत्त्वाकांक्षी कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
अंत्रवली गावातून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शहानवाझ शहा आणि प्रथमेश पोमेंडकर यांच्या अथक सहकार्य व प्रयत्नांमुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार होत आहे. नदीतील साचलेला गाळ काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करणे, तसेच पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या कामाला सुरुवात होताच उपस्थित ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नाम फाउंडेशन आणि या कार्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले. केवळ एका गावापुरते मर्यादित न राहता, हळूहळू प्रत्येक गावात नदीपात्रातील गाळ काढून पूर्वीप्रमाणे पाण्याचे डोह निर्माण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे, निर्माण करण्यात येणाऱ्या प्रत्येक डोहाच्या खालच्या बाजूला साधा; मात्र मजबूत बंधारा उभारण्याचा मानसही ग्रामस्थांनी बोलून दाखविला. यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि उन्हाळ्यात जनावरांसह ग्रामस्थांनाही पाण्याचा आधार मिळू शकेल.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम शास्त्री नदीकाठच्या गावांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहे. शासनाच्या मदतीची वाट पाहत बसण्यापेक्षा ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत नाम फाउंडेशनच्या सहकार्याने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. आज अंत्रवलीत सुरू झालेली ही जलसंवर्धनाची चळवळ उद्या शास्त्री नदीच्या संपूर्ण खोऱ्यात विस्तारली, तर अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होऊ शकते. यावेळी अंत्रवली गावातील ग्रामस्थांसह राजेंद्र पोमेंडकर, रूपेश इंदुलकर, सुयोग पवार तसेच नाम फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.
Comments are closed.