पुणे वन विभागात साडेबारा कोटींचा वृक्षलागवड घोटाळा? कागदावर 2 लाख झाडे, प्रत्यक्षात रोपे वाळली! प्रकरण उघड करणारा वन अधिकारीच निलंबित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे वन विभागाकडून वृक्षलागवडीच्या नावाखाली साडेबारा कोटी रुपयांचा खर्च केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील तळजाई टेकडी, वेताळ टेकडी, रामटेकडी यांसह 12 ठिकाणी 68 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख 4 हजार झाडे लावण्यासाठी जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत हा खर्च केल्याचे कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला मे महिन्यात सुरुवात झाल्याचे वर्क ऑर्डरवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे 31 मार्च रोजी एकाच दिवसात साडेबारा कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली. दुसरीकडे, वृक्षलागवडीसाठी आणलेली अनेक रोपे न लावताच वाळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. ABP माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

या प्रकरणात वन विभागाचे अधिकारी वन अधीकक्ष जालंधर पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कामासाठी 8 कोटी रुपयांची खरेदी दाखवण्यात आली. त्यामध्ये 6 कोटी रुपयांचे शेणखत आणि 2 कोटी रुपयांचे कोकोपीट खरेदी केल्याचे नमूद आहे. मात्र, एवढ्या मोठ्या खरेदीसाठी साधे दरपत्रक मंजूर करण्यात आले नाही किंवा निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली नाही. मार्चमध्ये खत खरेदी केल्याचे दाखवले असताना जानेवारी महिन्यातच ते पसरल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक हेक्टरसाठी 150 मनुष्यदिवस आणि मजुरांवर 80 हजार रुपये खर्च केल्याचेही कागदपत्रांमध्ये नमूद आहे. प्रत्यक्षात काम झाले नसताना मजुरांच्या नावावर खर्च दाखवून पैसे वळवण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. ही कागदपत्रे माहिती अधिकारातून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

जालंधर पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. 5 जून रोजी पर्यावरण दिनाच्या दिवशी त्यांनी पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आणि त्यानंतर आपल्याला त्रास देण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. या प्रकरणातील अनियमितता समोर आणल्यानंतर आपल्याला निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनीही या प्रकरणावरून वन विभागावर टीका केली. प्रत्यक्षात झाडे लावली नसताना वृक्षलागवडीची बिले काढण्यात आली असून जंगल कागदावर उभे केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वृक्षलागवड केल्याचा दावा केला जात आहे, त्यातील काही भागांमध्ये आधीपासूनच झाडे असताना पुन्हा लागवड दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तळजाई टेकडीसह इतर ठिकाणी रोपे वाळून गेल्याचेही समोर आले आहे.

दुष्काळाची परिस्थिती आणि एल निनोचा पावसावर होणारा संभाव्य परिणाम माहीत असतानाही अशा प्रकारे वृक्षलागवडीची कामे नियोजित केल्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. साडेबारा कोटी रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात काम झाले का, खरेदी आणि मजुरीच्या नोंदी कितपत खऱ्या आहेत? याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.