यवतमाळात शिवसैनिक आक्रमक! दत्त चौकात जोरदार आंदोलन; शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याच्या प्रकारावरून यवतमाळात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. मिंधे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्या विरोधात गुरुवारी शहरातील दत्त चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला.
बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असल्याने त्यांच्या अवमानामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
माफी नको, कायदेशीर कारवाई करा!
या प्रकरणाचे पडसाद मुंबईसह राज्यातील विविध भागांत उमटत असून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जात आहे. केवळ माफी मागून हा विषय संपणार नाही. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
शायना एनसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
दत्त चौकात घोषणाबाजीने परिसर दणाणला!
यवतमाळातील दत्त चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले होते. सरकार आणि शायना एनसी यांच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. ‘सरकारचा निषेध असो’, ‘खाली डोकं वर पाय’ आणि ‘जाहीर निषेध’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या कथित अवमानाचा मुद्दा भावनिक आणि पक्षाच्या अस्मितेशी संबंधित असल्याचे सांगत, संबंधितांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Comments are closed.