दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार, विधिमंडळ अधिवेशनात नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी यंदा विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली असून, आगामी विधिमंडळ अधिवेशनात नामकरणाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा फडणवीस यांनी केली.

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेता यंदा उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षी जाणवलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.