महायुतीची सत्ता येताच गोकुळचे दूध सहा रुपयांनी महागले, शनिवारपासून नवीन दर लागू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे सांगितले जात आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये, तर खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार असणार आहे.

गोकुळच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महायुतीच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिवाजी पाटील यांची गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. म्हशीच्या दुधाबरोबरच गाईच्या दुधाचे दरही वाढवण्यात आले आहेत. गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अमूलसह देशातील अनेक दूध उत्पादक संस्थांनी यापूर्वीच दूध विक्री दरात वाढ केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोकुळकडूनही दरवाढीचा विचार सुरू होता. मात्र, विक्री दरवाढ करण्यापूर्वी दूध उत्पादकांना मिळणाऱ्या खरेदी दरात वाढ करावी, अशी मागणी समविचारी आघाडीकडून करण्यात आली होती. अखेर संचालक मंडळाच्या बैठकीत खरेदी आणि विक्री या दोन्ही दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारपासून नवीन दर लागू होणार असल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता पाहून पुन्हा दरवाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.