अलिबाग न्यायालयाचा दणका, भाजप आमदारासह 4 जणांना सुनावली 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भाजप आमदार महेश बालदी यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. 2010 मधील एका प्रकरणात आमदार महेश बालदी यांच्यासह एकूण 4 जणांना अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 16 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. मात्र, शिक्षा होऊनही सर्व चारही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आरोपींना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच सत्र न्यायालयाने दिलेल्या या निकालावर जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.

महेश बालदी हे रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. तसेच अलिबाग न्यायालयाने दिलेला निकाल हा 2010 मधील मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. 2010 मध्ये मुलीची छेड काढली म्हणून संबंधित तरुणाला जाब विचारण्यासाठी आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यावेळी झालेल्या झटापटीत संबंधित तरुणाला शिवीगाळ आणि माराहण करण्यात आली होती. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी मागील 16 वर्षांपासून अलिबाग येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. 16 वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला आणि आमदार महेश बालदी यांच्यासह चारही जणांना दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे या चारही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला असून अलिबाग जिल्हा न्यायालयात अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आलीय.

Comments are closed.