मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका

जालना : दोन्ही बंधू एकत्र आले चांगली गोष्ट आहे, दोघांनी एकत्र रहावे, एकत्र काम करावे. मात्र, पुढच्या काळात पुन्हा एकदा विभक्त व्हायची पाळी येऊ देऊ नये असे वागा, असा सल्लाच माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी आज युतीची घोषणा केली, त्यावेळी रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी केलेल्या टीकेवर पलटवारही केला. ज्यांना पक्षात किंमत उतरली नाही त्यांच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर, उत्तर देवाच्या प्रश्नाला देतात, दानवाच्या नाही असा टोला राज ठाकरे लगावला होता. आता, ठाकरे बंधूंनी खिल्ली उडवलेल्या दानवेंनी पलटवार केला आहे.

इकडे युतीची त्यांची प्रेस कॉन्फरन्स चालली आणि दुसरीकडे कार्यकर्ते सोडून चालले. मी बोललेलं त्यांच्या जिव्हारी लागलं, असे म्हणत रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना लक्ष्य केलं. मी या पक्षात जनता पार्टीपासून काम करतो. या पार्टीने मला सभापती, आमदार, खासदार आणि केंद्रात दोनदा मंत्री केलं. मला राज्याचा अध्यक्ष केलं, हेच नाही माझा मुलगा आज आमदार आहे. उद्धव ठाकरे साहेबांसारखा काळा बुरखा घालून, शेपूट घालून  मी विधानपरिषदेतं गेलो नाही. मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. समोरून पुढच्या दाराने डरकाळी मारत विधानसभेत आणि लोकसभेत गेलो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेवर पलटवार केला.

माझं म्हणणं लागण्याचे काय कारण? त्यांना मी सांगितलेलं भविष्य खरं ठरलं, त्यांचा पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाही. प्रचारात फिरत असताना मला समजत होतं, म्हणून मी म्हणलो. आणि झाले काय एकाचे आले नऊ आणि एकाचे आले सात. दोन अंकी सुद्धा येऊ शकले नाहीत, अशी आकडेवारीच दानवेंनी सांगितली. उद्धव ठाकरेंना इतकं झोंबायचे काय कारण. शेपूट घालून काळा बुरखा घालून विधान परिषदेमध्ये पोहोचले. हा पठ्ठ्या सात वेळा निवडून आला पुढच्या दाराने. वाघासारखा डरकाळी फोडत गेला, त्यांना झटका यायचं कारण काय? असेही दानवेंनी म्हटले.

राज ठाकरेंना वेटिंगवर राहू द्या

दरम्यान, दोन्ही भावावर एकदाच टीका करू नये, राज साहेबांना राहू द्या वेटिंगवर. उद्या होऊन जाऊ द्या, उद्या काय बोलते ते पाहू द्या असे म्हणत राज ठाकरेंवर पलटवार करण्यासाठी आणखी वाट पाहा, असेच दावनेंनी सूचवले आहे.

संजय राऊतांच्या टीकेवर पलटवार

नगरपालिका निवडणुकीत भोकरदनमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली होती, त्यावरही रावसाहेब दानवे यांनी पलटवार केला आहे. भोकरदनचे सामाजिक समीकरण तसं आहे, आतापर्यंतच्या इतिहासात आम्ही भोकरदन जिंकलो नाहीत. सामाजिक समीकरणातील काही मंडळी तुमच्याकडे आली आहेत, त्यांनीच सत्यनाश केला तुमचा, त्यांच्या नादी लागल्यामुळे तुम्ही नऊवर आले, असे म्हणत दानवेंनी संजय राऊतांवर टीका केली.

हेही वाचा

सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल

आणखी वाचा

Comments are closed.