मुनगंटीवार-जोरगेवार वाद आता थेट दिल्ली दरबारी! चंद्रपूरमधील भांडणासमोर भाजपचे प्रदेश नेतृत्व हतबल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपुरातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे प्रदेश नेतृत्व हतबल झाले आहे. माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद मिटवणे राज्यातील भाजपच्या नेतृत्वाला जमत नसल्याने आता हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. भाजपमधील या दोन नेत्यांमधील वादासमोर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पुरते हतबल झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीपासून सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार या दोन नेत्यांमधील संघर्ष उघडपणे दिसला होता. उमेदवारांची यादी जाहीर करताना 17 नावांमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. बदलण्यात आलेली सर्व नावे ही मुनगंटीवर गटासंबंधित होती. एवढे सर्व होऊनही मुनगंटीवार यांनी महापौरपदावर आपल्या गटातील संगीता खांडेकर यांची निवड करून जोरगेवार यांना आपले वर्चस्व दाखवून दिले होते, तर दुसरीकडे जोरगेवार गटाला नगरसेवकांची संख्या जास्त असूनही त्यांना गटनेता पदाव्यतिरिक्त कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे जोरगेवार गट जास्तच नाराज झाला. यामुळे जोरगेवार यांनी आपल्या समर्थक 17 नगरसेवकांसह नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत कोणताही तोडगा न निघाल्याने आता हा वाद थेट दिल्लीदरबारी जाणार आहे.

Comments are closed.