पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत संघर्ष चिघळला, महिला पदाधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारलं
Pimpri Chinchwad Crime BJP Anup More: पुणे आणि मुंबईत सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला असतानाच आता पिंपरी चिंचवडमधील एका प्रकरणामुळे भाजपची (BJP) डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) भाजपच्याच एका महिला पदाधिकाऱ्याने आपल्याच संघटनेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (Anup More) यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस तेजस्विनी कदम यांनी मोरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मला जीवे मारण्यासाठी मोरेंनी पुरुष आणि महिला समर्थकांना पाठवले होते. तसेच चौकीत पोलिसांदेखत मला मारहाण केली, असा आरोप तेजस्विनी यांनी केलाय. तेजस्विनी कदम यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मी आशिष गावडेंच्या घरी 26 ऑक्टोबरच्या दुपारी दोन वाजता गेले होते. त्यावेळी बंगल्याबाहेर प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे, जयेश मोरेंसह पाच ते सहा महिला आणि पुरुष उभे होते. त्यांनी मला बंगल्याबाहेर पाहताच आमचा अनुप दादा इथं असताना तू का आलीस? तू इथून निघून जा, आम्हाला अनुप दादांनी तुला मारुन टाकायला सांगितले आहे. तुला गाडीने उडवून देऊ, अनुप दादांवर आमचं खूप प्रेम आहे. त्यामुळं तुला बदनाम करु, तुझं जगणं मुश्किल करू, अनुप दादा आमचा बाप आहे. तो आम्हाला सांभाळून घेईल. अशी मला धमकी दिली गेली. हे पाहता अनुप मोरेंकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं माझ्या निदर्शनास आल्याने मी पुन्हा माझा भाऊ आशिष गावडेंच्या बंगल्यात गेले. मग कलाटे मला एका गाडीतून सोडवण्यासाठी आले, तेव्हा गाडीला काही महिलांनी घेराव घातला. तिथून मी थेट चिंचवड पोलीस ठाण्यात आले, तिथं ही या महिला पोहचल्या. त्याठिकाणी महिलांनी मला ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तेजस्विनी मोरे यांनी सांगितले.
गुन्हा दाखल करुन मी पोलीस ठाण्यातून बाहेर पडले तेव्हा पोलीस स्टेशन बाहेर शंभरहून अधिक पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. त्यांनी अनुप मोरेंच्या नावाने तुला मारुन टाकू, अशी धमकी दिल्याचं ही फिर्यादीत म्हटलं आहे. मात्र, पोलिसांनी अनुप मोरेंचे नाव फिर्यादीत घेतलं नाही. हे पाहून तेजस्विनी यांनी पोलीस उपायुक्तांसामोर आगपाखड केली. अखेर अनुप मोरेंचे नाव गुन्ह्यात समाविष्ट केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. पण आता तेजस्विनी कदमांना याबद्दल विचारलं असता, मला भाजपच्या राज्य पातळीवरील वरिष्ठांची परवानगी घेऊन बोलावं लागेल, असे त्यांनी कळवले. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी माध्यमांसमोर काही बोलू नये, म्हणून त्यांच्यावर भाजपकडून दबाव टाकला जातोय? अशी चर्चा रंगलेली आहे.
तर दुसरीकडे अनुप मोरेंनी हे सर्व आरोप फेटाळलेत. मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो, माझी बदनामी करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत, असा दावा मोरेंनी केला आहे. सध्या मी मुंबईत असून शहरात आल्यानंतर आपल्याशी सविस्तर बोलतो, असं मोरेंनी फोन वरुन कळवलं. मात्र, पोलिसांनी तेजस्विनी कदमांवरही गुन्हा दाखल करायला हवा, परंतु पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. असा आरोप मोरेंनी केलाय.
Anup More: अनुप मोरेंनी आरोप फेटाळले
अनुप मोरेंनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत. उलट तेजस्विनी यांनी आशिष गावडेंसोबत भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडेंच्या घरात विनापरवाना प्रवेश केला. त्यामुळं त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची गरज असताना, उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केला. मला बदनाम करण्यासाठी हे खोटेनाटे आरोप केले, असा आरोप मोरेंनी केला. मी आत्ता मुंबईत आहे, पण शहरात आल्यावर आपल्याशी सविस्तर बोलेन. असं अनुप मोरेंनी सांगितलं. मात्र, आता दाखल झालेल्या गुन्ह्यात पिंपरी चिंचवड पोलीस निःपक्षपातीपणे तपास करणार का? आणि अनुप मोरेंना अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस तेजस्विनी कदम हे अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगली ओळखून आहेत. मात्र, त्यांच्यात यानिमित्ताने चांगलीच खडाजंगी रंगलीये. यावरुन केवळ शहरातचं नव्हे तर राज्यभर विविध चर्चा रंगलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता याप्रकरणी नेमकी काय पावलं उचलतात? अन या प्रकरणावर काय भाष्य करतात? हे पाहणं महत्वाचं राहील. या वादाने विरोधकांना आरोप करण्याची आयती संधी उपलब्ध करुन दिलीये.
इतर बातम्या
‘ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत…’; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.