‘अदानी ग्रीन एनर्जी’ला ब्लॅकलिस्ट करा, अभिनेते सयाजी शिंदे यांची मागणी; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात पुण्यात 3 डिसेंबरला मोर्चा
सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये वीज प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात असून भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज वीज प्रकल्पासाठी दुर्मिळ झाडेही तोडली जात आहेत, असा गंभीर आरोप करत हे सगळे तत्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी करत झाडांची कत्तल करणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीवर कठोर कारवाई करून तिला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे. सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात पुण्यात येत्या 3 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली आहे.
सध्या सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे हे आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा याविरोधात आवाज बुलंद केला आहे. सह्याद्रीतील निसर्गसंपदा तसेच वृक्षसंपत्ती धोक्यात येत असून भीमाशंकर आणि तारळी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. अतिदुर्मिळ झाडांची कत्तल केली जात आहे, असा गंभीर आरोप सयाजी शिंदे यांनी केला आहे. पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या नसतानाही हे काम सुरू आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. राज्यात वीज प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱहास करू नका, आमचा विकासकामांना विरोध नाही, परंतु त्यासाठी जंगल आणि झाडांचा बळी देणे योग्य नाही, एकही झाड न तोडता तसेच निसर्गाचे कोणतेही नुकसान न करता वीज प्रकल्प राबवता येतील का हे पाहा, असे सयाजी शिंदे यावेळी म्हणाले.
जंगल आणि झाडांचा बळी देणे योग्य नाही, एकही झाड न तोडता तसेच निसर्गाचे कोणतेही नुकसान न करता वीज प्रकल्प राबवता येतील का हे पाहा आणि झाडांची कत्तल करणाऱया अदानी ग्रीन एनर्जी कंपनीवर कठोर कारवाई करून तिला काळ्या यादीत टाका!
दोषींवर कारवाई करा
कंपनीतील जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी शिंदे यांनी केली असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला सार्वजनिक कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये सयाजी शिंदे यांनी अदानी ग्रीन एनर्जीला काळय़ा यादीत टापून भीमाशंकर आणि तारळीतील प्रकल्पांचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
पुढच्या पिढीसाठी हा लढा
वृक्षतोडीविरोधात येत्या 3 डिसेंबरला पुकारण्यात आलेला मोर्चा हा पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ापासून निघणार असून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात राज्यातील नागरिक, पर्यावरणप्रेमी, निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱया संघटनांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले आहे. पुढच्या पिढीला स्वच्छ हवा, सुरक्षित पर्यावरण मिळावे यासाठी हा लढा आहे, असे ते यावेळी म्हणाले.
Comments are closed.