चेन्नई काही परदेशात नाही! 1.37 कोटींच्या फसवणूक प्रकरणात हायकोर्टाचे खडे बोल
सायबर फसवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची 1 कोटी 37 लाख रुपयांची रक्कम गहाळ होऊन दोन वर्षांहून अधिक काळ उलटला. मात्र तपास अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, यावरून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फैलावर घेतले. तपासाची अवस्था दयनीय असून तपास अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन असंवेदनशील असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. इतकेच नव्हे तर चेन्नई काही परदेशात नाही की, तेथे जाण्यासाठी तुम्हाला किचकट प्रक्रिया पार पाडावी लागेल, असे खडे बोलही पोलिसांना सुनावले.
वडाळा येथे राहणारे धिरेन रॉय हे सेवानिवृत्त असून सायबर फ्रॉडद्वारे त्यांच्या विविध बँक खात्यांतून एफडी तसेच सेव्हिंग अकाऊंटमधून 1 कोटी 37 लाख काढण्यात आले. या फसवणूक प्रकरणी बँक तसेच सायबर पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याप्रकरणी अॅड. अभिजित राणे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम सुरुवातीला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील एका बँकेत हस्तांतरित झाल्याचे तपास अधिकाऱयांच्या निदर्शनास आले होते. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही संबंधित बँकेत जाऊन रक्कम परत मिळवण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे फसवणूक करणाऱयांना मदत झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
Comments are closed.