मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? ‘या’ पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
बीएमसी आयुक्त: मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी (BMC commissioner) वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चुरस वाढली असून, या महत्त्वाच्या पदासाठी काही प्रमुख नावांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (Ashwini Bhide) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर (Milind Mhaiskar) ही दोन नावे सध्या आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. या दोघांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत.
या शर्यतीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावेही चर्चेत आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांचे नावही सुरुवातीला घेतले जात होते. मात्र, वर्षाअखेर त्यांची दिल्लीतील महत्त्वाच्या पदावर प्रतिनियुक्ती होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या संधी कमी झाल्याचे मानले जात आहे.
अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे.
दुसरीकडे, डॉ. मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अनुभवी आयएएस अधिकारी असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. प्रशासनातील त्यांच्या अनुभवामुळे तेही या पदासाठी मजबूत दावेदार मानले जात आहेत. जर अश्विनी भिडे यांना मुख्यमंत्री कार्यालयातच पुढील जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय झाला, तसेच मेट्रो प्रकल्पाची सूत्रेही त्यांच्याकडेच ठेवण्यात आली, तर म्हैसकर यांच्या नावाला अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BMC commissioner : अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार
मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा होणार असल्याचे समजते. नगरविकास खाते शिंदे यांच्या अखत्यारीत असल्यामुळे आणि मुंबई महापालिकेत त्यांचा पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांच्या मताला विशेष महत्त्व दिले जाणार आहे. एकूणच, मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या महानगराच्या प्रशासनाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रशासनातील अनुभव, कार्यक्षमता आणि सध्याच्या जबाबदाऱ्यांचा समतोल साधत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.