मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट

बीएमसी निवडणूक 2026 मुंबई महापौर: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता आपला महापौर बसवण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. त्यानुसार येत्या 30 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेत भाजपचा (BJP) महापौर कारभाराची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) हे मंगळवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. यानिमित्ताने भाजपचे मुंबई आणि महाराष्ट्रातील नेते सध्या दिल्लीत आहेत. याच नेत्यांच्या गोटातून येत्या 30 तारखेला भाजपचा महापौर मुंबईची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Mahanagarpaliaka Mayor)

यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ गरजेचे असल्याने भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. मात्र, भाजपची गरज ओळखून शिंदेंच्या शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे पहिल्या अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद आणि स्थायी व बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाने शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपने दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मित्रपक्षांना समजावून सांगा, असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला होता. यानंतर काहीवेळातच दिल्लीतील भाजप नेत्यांच्या गोटातून येत्या 30 जानेवारीला भाजप मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवून राज्यरोहण करेल, अशी माहिती समोर आली आहे.

या सगळ्या घडामोडींबाबत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी भाष्य करताना म्हटले की, आजघडीला देशाचे सरासरी वय 28 इतके आहे. पंतप्रधान मोदी यांनी युवा पिढीला पुढे आणण्याचे काम केले आहे. स्टॅण्डअप इंडिया, स्टार्टअप इंडियासारखे उपक्रम आणले. आज भाजपचा तरुण अध्यक्ष पदभार स्वीकारणार आहे. कुठलीही तडजोड करण्याचा प्रश्नच नाही. महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. गट स्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन केलं आहे. शिवसेना शिंदे आणि भाजपची बैठक आज दिल्लीत होणार आहे. परंतु गट स्थापनेसंदर्भात चर्चा होईल. भाजपचा कार्यकर्ता कोणतंही पद मिळवण्यासाठी काम करत नाही. आम्ही पद मिळवण्यासाठी आग्रही नाही, असे अमित साटम यांनी सांगितले.

आणखी वाचा

मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून आदेश आला, शिंदे सेनेच्या आकांक्षांना सुरुंग लागणार?

आणखी वाचा

Comments are closed.