मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला…; लालबागच्या शिवडीमधील संतोष नलावडेंची पोस्ट, नेमकं काय
संतोष नलावडे राज ठाकरे-उद्धव ठाकरेंवर: कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) मनसेनं (MNS) शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. सत्तेत असल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही, असं मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवलीत एकत्रित लढलेल्या भाजपला 50 तर शिंदेंना 53 जागा मिळाल्यात. त्यामुळे महापौर कुणाचा होणार यावरुन जोरदार रस्खीखेच सुरु आहे. मात्र आता शिंदे पिता-पुत्रांनी मनसेचे 5, ठाकरेंचे नॉट-रिचेबल असलेले 4 आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून बहुमताचा आकडा ओलांडला. मात्र महापौर महायुतीचाच होईल, असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. सध्या दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री हे सगळं कशाप्रकारे हँडल करतायत हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे लालबागच्या शिवडीमधील पदाधिकारी संतोष रघुनाथ नलावडे यांनी केडीएमसीमध्ये मनसेने अखेर खऱ्या शिवसेनेला साथ दिल्याचं म्हटलं आहे. (Santosh Nalawade On MNS)
ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे मनसेचे नुकसान झाले. मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला, असं संतोष नलावडे यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे. 2017 च्या निवडणुकीत मनसेचे स्वबळावर लढून 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यापेक्षा यावेळी स्थिती अधिक चांगली होती. परंतु उबाठा सोबत युती केल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. उबाठाने मुळात कमी जागा मनसेला दिल्या. त्यातही निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेऊन पडीक जागा मनसेच्या माथी मारल्या. निवडणुकीत मनसेला मदत केली नाही. मनसेच्या प्रभागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांना अन्य प्रभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसेचे उमेदवार एकाकी लढत होते, असं संतोष नलावडे यांनी सांगितले. (MNS KDMC 2026)
मनसेची मतं उबाठाला ट्रान्सफर झाली, पण उबाठाची मतं मनसेला ट्रान्सफर झाली नाही- संतोष नलावडे (Raj Thackeray-Uddhav Thackeray)
मागच्यावेळी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक उबाठाने पळवले होते. मनसेला संपवण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु मनसेला असे संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अन्य कशाही पेक्षा महाराष्ट्र महत्वाचा आहे हे निवडणुकीपूर्वी सांगितले होते. आता त्याच विचाराने महाराष्ट्र व मुंबईच्या विकासासाठी भाजप आणि स्व.बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या खऱ्या शिवसेनेसोबत जावे लागेल. 2019 साली जनतेने वेगळा जनादेश दिलेला असताना तो नाकारून स्वार्थासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी विचारधारेसोबत गेले होते. मनसेने हिंदुत्व व बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या लोकांसोबत पुढे जायला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते कोणाचेच होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणे चुकीचे नाही, तर धोक्याचे आहे. हीच वेळ आहे मनसेला सावरण्याची, असंही संतोष नलावडे यांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे 7 नगरसेवकही मोठा निर्णय घेणार?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेनं शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यानं आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकही मोठा निर्णय घेणार का?, अशी चर्चा सुरू झाली. कारण उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत या नगरसेवकांनी मोठी भूमिका मांडली. भाजप आणि शिवसेनेकडून आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, असं हे 7 नगरसेवक उद्धव ठाकरेंना म्हणाले.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC निवडणूक निकाल 2026)
भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
राष्ट्रवादी-3
एसपी-2
राष्ट्रवादी शप – १
————-
एकूण- 227
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.