गळय़ावरील 7 गंभीर जखमा खुनाचाच हेतू दर्शवतात, हायकोर्टाकडून आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मृत व्यक्तीच्या गळ्यावर आणि शरीरावर झालेल्या 7 गंभीर जखमांवरून आरोपीचा उद्देश निव्वळ दुखापत करण्याचा नव्हता, तर त्याचा स्पष्ट हेतू खुनाचाच होता असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडीतील हत्येप्रकरणी आरोपीला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

आरोपी भगवान पुंभार याला हत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने हायकोर्टात अपील दाखल केले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना युक्तिवाद केला की, ही घटना पूर्वनियोजित नसून, अचानक उद्भवलेल्या वादातून घडली. त्यामुळे हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) अंतर्गत येत नाही, तर तो कलम 304 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गृहीत धरण्यात यावा व आरोपीची शिक्षा कमी करण्यात यावी. सरकारी वकिलांनी मात्र याचिकाकर्त्याचा हा दावा फेटाळून लावला. घटनेवेळी क्रिकेट खेळणारी तीन मुले त्या ठिकाणी उपस्थित होती. हत्येनंतर सुरा झाडीत टापून आरोपी पळाल्याचे ते प्रत्यक्षदर्शी होते. या साक्षीदारांनी नोंदवलेल्या जबाबानुसार आरोपीचा मूळ हेतू हत्या करण्याचाच होता असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकाकर्त्याचे अपील फेटाळून लावले.

घटना 2011 मध्ये घडली आणि साक्षीदारांच्या साक्षी 2013 मध्ये नोंदवण्यात आल्या. इतक्या मोठय़ा कालावधीनंतर साक्षीदारांच्या सांगण्यात येणाऱ्या अशा किरकोळ विसंगती नैसर्गिक असून त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि मूळ घटनेवर कोणताही संशय निर्माण होत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Comments are closed.