‘तेजस’सह बाहेरून येणाऱ्या अनेक गाडय़ा दादरपर्यंत धावणार, प्लॅटफॉर्म विस्तारीकरण संथ गतीने चालल्याने प्रवाशांचे हाल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17 या दोन प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामासाठी सीएसएमटीतील ट्रफिक आणि पॉवर ब्लॉकची मुदत 13 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या तेजस एक्सप्रेससह अनेक गाडय़ा सीएसएमटीऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. परिणामी, प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे (आरएलडीए) सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी यापूर्वी 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत ब्लॉक लागू करण्यात आला होता. नंतर त्याची मुदत 19 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यात आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर पायाभूत कामे आणि इतर आवश्यक कामे केली जातील, असे मध्य रेल्वेने बुधवारी जाहीर केले.
या गाडय़ांचा दादरमध्ये प्रवास शेवट
सीएसएमटीऐवजी दादर स्थानकात प्रवास समाप्त होणाऱ्या गाडय़ांमध्ये अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, बल्लारशाह-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्प एक्स्प्रेस, बिदर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, लातूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस या गाडय़ांचा समावेश आहे.
Comments are closed.