विधान परिषद निवडणूक; महाविकास आघाडी सर्व जागा लढणार! दोन दिवसांत जागावाटप जाहीर करणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा लढवणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीने आज केली. दोन दिवसांत सर्वसंमतीने जागावाटपाचा निर्णय जाहीर करू, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
जागावाटपाची प्राथमिक चर्चा करण्यासाठी टिळक भवनमध्ये ही संयुक्त बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, ऍड. अनिल परब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपस्थित होते.
भाजपा लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, पैसा फेक तमाशा देखचा दुसरा अंक सुरू झाला असून 5 लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे. अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे, असे हर्षवर्धन सपकाळ या वेळी म्हणाले.
विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात आम्ही चर्चा केली आहे. 29 तारखेला पुन्हा चर्चा होऊन जागा वाटपाबाबत निर्णय होईल. त्यानंतर उमेदवार ठरवले जातील, असे शशिकांत शिंदे या वेळी म्हणाले. राष्ट्रवादीतील अनेक आमदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चेबाबत त्यांना या वेळी पत्रकारांनी विचारले असता अद्याप ती केवळ चर्चा असून पक्षाकडे कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. काही आमदारांना चौकशीची भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचेही ते म्हणाले.
महायुतीतील वाद मिटता मिटेना भाजप 12 जागांवर ठाम, शिंदेंना जळगावही हवे
महायुतीत जागांचा वाद मिटता मिटेना झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिकनंतर शिंदे गटाला जळगावची जागाही हवी आहे. पण भाजपने मात्र आपली 12 उमेदवारांची यादी फायनल केली आहे. जागांचा वाद घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्यांनी व्यथा मांडली. पण निराशा पदरी पडली. तिथून परतल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचा दावा केला. जागा वाटपाची चर्चा दोन दिवसांत संपेल असे ते म्हणाले. शहांच्या भेटीवेळी तिथे मुख्यमंत्री फडणवीस हेसुद्धा होते. ते थांबले आणि मी निघालो असे शिंदे यांनी सांगितले.
Comments are closed.