उत्तर प्रदेशातील नेत्यांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

उत्तर प्रदेश सरकारने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना अधिकाधिक सुरक्षा देण्यासाठी योजना घोषित केली आहे. या योजनेचा भाग म्हणून 52 प्रमुख नेत्यांना बुलेटप्रूफ जॅकेटस् देण्यात आली आहेत. प्रत्येक जॅकेटची किंमत साधारणत: 10 लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती देण्यात आली. ज्या नेत्यांना अशी जॅकेटस् देण्यात आली आहेत, त्यांच्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अखिलेशसिंग यादव, मायावती आदी महनीय व्यक्तींचा समावेश आहे.

दोन टप्प्यांमध्ये ही जॅकेटस् नेत्यांना देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून अनेक नव्या नेत्यांना सुरक्षा आवरण देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते स्वतंत्रदेव सिंग, जयवीर सिंग आणि महेंद्र सिंग यांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्या  खेरीज 98 नेते आणि महत्वाच्या व्यक्तींना विविध श्रेणींची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे, अशीही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या सज्जतेला प्रारंभ केला आहे.

राज्यात अनेक संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या असून पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्येही उत्तर प्रदेशच्या अनेक तरुण नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. धर्म, जात आणि सामाजिक समीकरणांवर भर देऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्राचा विचार केला जात असून कार्यकर्त्यांची फळी तेथे उभी करण्याची भारतीय जनता पक्षाचे योजना आहे. प्रत्येक मतदानकेंद्राचा स्वतंत्ररित्या आणि एकत्रितरित्या अभ्यास करुन, तेथे पक्षाची स्थिती कशी आहे, याचे आकलन करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या राज्यात येत्या मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होत आहे.

Comments are closed.