विद्यार्थ्यांना स्वतःच्या मर्जीने परीक्षा केंद्र निवडता येते का? बोर्डात 40 ते 50 टक्के अन् सीई

मुंबई: इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेमध्ये ९९ ते १०० पर्सेंटाईल (टक्के) गुण मिळवून देण्यासाठी १२ ते १३ लाख रुपये पालकांकडून उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशिष्ट परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थी चांगले मार्क्स कसे मिळवू शकतात हे सांगत सीओईपी (COEP) आणि व्हीजेटीआय (VJTI) यांसारख्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन (CET Exam Audio) मिळवून देण्याचे आमिष विद्यार्थी आणि पालकांना दाखवले जात आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी माहिती देताना(CET Exam Audio) सांगितले की, “या ऑडिओ क्लिपसंदर्भात थेट तक्रार आमच्याकडे अद्याप आलेली नाही. मात्र, त्या ऑडिओची दखल घेत आम्ही सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यासोबतच आझाद मैदान पोलीस ठाण्यातसुद्धा तक्रार नोंदवली आहे. सगळ्या गोष्टी चौकशीनंतरच कळतील की तो ऑडिओ कुठला आहे, काय आहे. आमच्याकडे तो ऑडिओ आल्यानंतर तात्काळ आम्ही पोलिसांना ही माहिती दिली आहे.”(CET Exam Audio)

CET Exam Audio : विद्यार्थ्यांना स्वतःच्या मर्जीने परीक्षा केंद्र निवडता येते का?

विद्यार्थ्यांना स्वतःच्या मर्जीने परीक्षा केंद्र निवडता येते का? यावर बोलताना सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, “विद्यार्थी चॉईस देतात, त्यांना चार ऑप्शन्स द्यावे लागतात. सीईटी सेल महिला उमेदवारांना प्राधान्य देते, त्यांना त्यांच्या पहिल्या ऑप्शनचा (पसंतीचा) जिल्हा दिला जातो. जे पुरुष उमेदवार आहेत, त्यांनासुद्धा त्यांचाच जिल्हा देण्याचा प्रयत्न असतो; मात्र संख्या जास्त असेल तर मग इतर जिल्हा दिला जातो. परीक्षेच्या सात दिवस आधी त्यांच्या शहराची स्लिप आम्ही रिलीज करतो. परीक्षेच्या एक-दोन दिवस आधीच आम्ही त्यांना सेंटर देतो. सेंटर सिलेक्ट करण्याचा कुठलाही अधिकार विद्यार्थ्याला नाही, कॉम्प्युटरसुद्धा रँडमली दिले जातात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.(CET Exam Audio)

CET Exam Audio : बारावी बोर्ड परीक्षेत ४० ते ५० टक्के गुण आणि सीईटी परीक्षेत ९० ते १००…

बारावी बोर्ड परीक्षेत ४० ते ५० टक्के गुण आणि सीईटी परीक्षेत ९० ते १०० पर्सेंटाईल कसे? यावर उत्तर देताना सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, “जे टॉपर आहेत, ते २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांच्या एका बॅचमधील टॉपर आहेत. पावणेपाच लाख जे एकूण विद्यार्थी बसले होते, त्या सर्वांचे ते टॉपर नाहीत. त्या बॅचमधील टॉपरच्या जवळ गुण मिळाल्याने त्यांना ९५ किंवा ९८ पर्सेंटाईल मिळाले आहेत. बारावी बोर्ड परीक्षा आणि सीईटी परीक्षा या दोन पूर्णपणे वेगळ्या परीक्षा आहेत. बारावीची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) आहे; त्याच्यासाठी लागणारे कौशल्य वेगळे आहे, तर सीईटी परीक्षेसाठी लागणारे कौशल्य वेगळे आहे. एका परीक्षेची दुसऱ्या परीक्षेशी तुलना करणे चुकीचे आहे. एका परीक्षेमधला परफॉर्मन्स दुसऱ्या परीक्षेत तसाच राहील, असे आपण म्हणू शकत नाही. बारावी बोर्ड परीक्षेत जे गुण मिळतात, त्याचा उपयोग फक्त पात्रतेसाठी (Eligibility) होतो. प्रवेशासाठी (Admission) त्याला कुठलेही वेटेज नाही. त्यामुळे मागील १०-१५ वर्षांपासून विद्यार्थ्यांचा विशेष कल हा सीईटी परीक्षेवरच आहे. आपण फक्त एका बाजूने विचार करतोय, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असेही अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना सीईटीमध्ये कमी आणि बारावी बोर्डात चांगले मार्क्स आहेत,” असेही त्यांनी पुढे सांगितले.

“चार लाख ६३ हजार विद्यार्थी सीईटी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन लाख ३५ हजार विद्यार्थी ‘कॅप राउंड’मध्ये (CAP Round) आले आहेत. उर्वरित दोन लाख २९ हजार विद्यार्थी आलेच नाहीत, ज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त पर्सेंटाईल होते. सध्या उपलब्ध ५०% डेटावरूनच आपण ॲनालिसिस करत आहोत. ऑडिओची चौकशी करण्यासाठी पोलिसांत आम्ही तक्रार दाखल केली आहे. आता जो डेटा तुम्ही म्हणताय, त्याचे ॲनालिसिससुद्धा आम्ही करत आहोत. ॲनालिसिस आम्ही पुढेही करू, पण त्यात संशयास्पद असे काही मिळत नाहीये. योग्य-अयोग्य काय, हे आपण केवळ या ॲनालिसिसमधून सध्या सांगू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेत कमी आणि दुसऱ्या परीक्षेत जास्त मार्क्स आहेत, त्यांचेसुद्धा ॲनालिसिस आम्ही करत आहोत,” अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

हेदेखील वाचा

Comments are closed.