“मी थेट मुद्द्यावरच येतो,” सलग चौथ्या पराभवानंतर कॅप्टन अय्यरचे स्पष्टीकरण! चहलला गोलंदाजी न देण्यामागचे कारणही सांगितले

आयपीएल २०२६ मध्ये सुरूवातीच्या सलग सात सामन्यांमध्ये अपराजित राहत आपली दहशत निर्माण करणाऱ्या पंजाब किंग्जची गाडी सध्या वेगळ्याच दिशेने जात आहे. सोमवारी (११ मे) धर्मशालामध्ये झालेल्या ५५ व्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट्सने पराभूत केले. त्यांचा हा आता सलग चौथा पराभव ठरला आहे. त्यांच्या या पराभवाला गोलंदाजी आणि पुन्हा एकदा ढिसाळ क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरले आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरूवात झाली असूनही त्यांनी १९ षटकांत ७ विकेट्स गमावत २१६ धावा करत विजय मिळवला. यामध्ये त्यांचा कर्णधार अक्षर पटेलने ३० चेंडूंत ५६ धावा आणि डेव्हिड मिलरने २८ चेंडूंत ५१ धावा केल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने त्यांच्या पराभवाचे आणि चहलला गोलंदाजी न देण्यामागचे कारण सांगितले आहे.

श्रेयस म्हणाला, “सरळ शब्दांत सांगायचे तर पुन्हा एकदा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण निराशाजनक झाले. २१० लक्ष्य बरोबर होते, कारण मला वाटतं की ज्याप्रकारे चेंडू स्विंग होत होता आणि उसळीही अनियमित होती, ते पाहता खेळपट्टीवर ३० धावा अधिक मिळायल्या हव्या होत्या. चहलला एक षटक टाकण्याचे मनात होते, मात्र ज्याप्रकारे चेंडू स्विंग होत होता आणि तो वेगवान गोलंदाजांना मदत करत होता, मला वाटतं की जर आम्ही आमची लाईन आणि लेंथ अचूकपणे साधली असती, तर आम्ही विकेट्स घेऊ शकलो असतो, पण दुर्दैवाने पुन्हा एकदा आम्ही तसं करू शकलो नाही.”

या सामन्यात चहलने एकही षटक टाकले नाही. अर्शदीप सिंग वगळता बाकींनी निराशा केली. अर्शदीपने ४ षटकांत २१ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये धावांचा पाऊस पडलेला दिसला. पंजाबकडून प्रियांश आर्य (५६) आणि श्रेयस (५९*) यांनी अर्धशतके केली. सूर्यांश शेडगेच्या ८ चेंडूंत नाबाद २१ धावा आणि कूपर कॉनोलीच्या ३८ धावा यामुळे पंजाबने २० षटकांत ५ विकेट्स गमावत २१० धावा केल्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात वाईट झाली. त्यांनी ४.३ षटकांतच ३ विकेट्स गमावत ३३ धावा केल्या होत्या. केएल राहुल (९), अभिषेक पोरेल (५) आणि साहिल पारेख (१३) स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल आणि मिलर यांनी डाव सांभाळला. या सामन्याच्या निकालाने गुणतालिकेत पंजाब चौथ्या आणि दिल्ली सातव्या स्थानावर आहेत.

Comments are closed.