IPL 2026 विजयानंतरही दिल्ली दूरच, सलग चौथ्या पराभवामुळे पंजाबही प्ले ऑफपासून लांबच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एका महिन्यात सलग सात सामने अपराजित राहात आयपीएलच्या गुणतालिकेवर हुकमत गाजवत असलेल्या पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्सकडूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पंजाबचा हा सलग चौथा पराभव असून दिल्लीने पाचव्या विजयासह आपले आव्हान जिवंत ठेवले असले तरी त्यांच्यासाठी प्लेऑफची दिल्ली दूरच आहे. आजच्या विजयानंतर दिल्ली सातव्या स्थानी पोहचली आहे, तर पंजाब 13 गुणांसह चौथ्या क्रमांकावरच स्थिर आहे.

पंजाबचे 211 धावांचे आव्हान दिल्लीला अवघड भासत होते. अर्शदीप सिंग आणि यश ठाकूरने पहिल्या पाच षटकांत दिल्लीचे आघाडीचे 3 फलंदाज गारद करून सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. मग ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेलने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते मागेच होते. स्टब्सही 18 धावांवर बाद झाला. 4 बाद 74 नंतर दिल्लीची अडचण वाढली होती. तेव्हा अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलरने धावांचा वेग वाढवत 64 धावांची भागी रचली. पुढे मिलरनेही 4 षटकार ठोकत सामन्याची रंगत वाढवली.

दिल्ली विजयापासून 41 धावा दूर असताना मिलरची खेळी बेन ड्वारशुईसने संपवली. मग आशुतोष शर्माने 10 चेंडूंत 24 धावा वसूल करत सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. त्याला माधव तिवारीने (18) जबरदस्त साथ दिली. शेवटी औकिब नबीने यश ठाकूरच्या चेंडूंवर षटकार आणि चौकार लगावत दिल्लीला सहा चेंडू आधीच विजय मिळवून दिला. 2 विकेट आणि 18 धावा ठोकणारा माधव आजच्या विजयाचा मानकरी ठरला.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून पंजाबला फलंदाजी दिली. पिऱयांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी आपल्या लौकिकास साजेसा घणाघाती खेळ करत 7 षटकांत 78 धावांची सलामी देत आपली कामगिरी चोख बजावली. प्रभसिमरन 18 धावांवर बाद झाला असला तरी आज पिऱयांशने षटकारबाजी करत वेगवान सलामी दिली. 6 षटकार आणि 2 चौकार खेचत तो 56 धावांवर बाद झाला. या यशस्वी सुरुवातीनंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि कूपर कोनोलीने 83 धावांची भर घातली, पण ही भागी अपेक्षित धावसंख्या गाठू शकली नाही.

स्टार्कने आपल्या 19 व्या षटकांत सलग चेंडूवर मार्कस स्टॉयनिस आणि शशांक सिंग यांची विकेट काढत पंजाबला धक्के दिले, पण सूर्यांश शेडगेने 6,4,6 असे फटके मारत संघाला द्विशतक ठोकून दिले. त्यानंतर एनगिडीच्या षटकाने सूर्यांश आणि श्रेयस बांधून ठेवत पहिल्या पाच चेंडूंवर केवळ 3 धावा दिल्या. मग शेवटच्या चेंडूवर शेडगेने षटकार ठोकण्यात यश मिळवले. अय्यर 69 तर सूर्यांश 21 धावांवर नाबाद राहिले आणि पंजाबला 210 अशी मजल मारून दिली.

Comments are closed.