मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्जने आयुष म्हात्रेच्या जागी 'या' खेळाडूला केले करारबद्ध

चेन्नई सुपर किंग्जने आयुष म्हात्रेचा बदली खेळाडू म्हणून आकाश मधवालला करारबद्ध केले आहे. सीएसकेने आज (२३ एप्रिल) सोशल मीडियामार्फत ही माहिती दिली आहे. दुखापतीमुळे आयुष म्हात्रे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)२०२६ च्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. मधवाल हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, त्याने यापूर्वी मुंबई इंडियन्स (२०२३, २०२४) आणि राजस्थान रॉयल्स (२०२५) या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

आकाश २०१९ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नेट बॉलर होता. त्याला २०२२ मध्ये एमआयने दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवला पर्याय म्हणून संघात घेतले होते. तेव्हा त्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र त्याने नेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आणि पुढच्याच हंगामात एमआयने त्याला करारबद्ध केले.

आकाशने आतापर्यंत १७ आयपीएल सामने खेळले असून त्यामध्ये २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याच्या पदार्पणाच्या हंगामातच प्रभावी कामगिरी केली होती. २०२३मध्ये एमआयला प्लेऑफमध्ये पोहोचवताना त्याने ८ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याच्या नावावर ‘पाच विकेट्सचीही कामगिरीही जमा आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या पदार्पणाच्या हंगामात, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात ५ धावा देत ५ विकेट्स अशी जबरदस्त गोलंदाजीची नोंद केली होती. ही प्लेऑफमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आहे.

याचवर्षी भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार असलेल्या म्हात्रेने सीएसकेसाठी या हंगामाची सुरुवात अत्यंत प्रभावीपणे केली होती. त्याने सहा सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली होती; मात्र, २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध फलंदाजी करत असताना त्याच्या डाव्या पायाच्या ‘हॅमस्ट्रिंग’ स्नायूला दुखापत झाली. दुखापतग्रस्त असतानाही त्याने फलंदाजी सुरूच ठेवली होती.

मधवालला २०२६ हंगामासाठी झालेल्या लिलावामध्ये कोणी खरेदी केले नव्हते. आता मात्र सीएसकेने त्याला ३० लाख रुपयांच्या किंमतीत संघात सामील झाला आहे.

Comments are closed.