IPL 2026 – चेन्नई-दिल्लीमध्ये वर्चस्वाची लढाई

मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आता चेन्नई सुपर किंग्जचा संघ दिल्ली पॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. चेन्नई आणि दिल्ली यांच्यामध्ये ही वर्चस्वाची लढाई असणार आहे. कारण दोन्ही संघांचे गुण समान आहेत. त्यामुळे या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो वरचढ ठरून प्ले ऑफच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये काय स्थिती

पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे समान 9 सामने झाले आहेत. या 9 सामन्यांत दोन्ही संघांनी चार विजय मिळवले असून पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, पण दिल्लीपेक्षा चेन्नईचा रन रेट चांगला असल्यामुळे ते सहाव्या स्थानावर आहेत, तर दिल्लीला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.

चेन्नई आली फॉर्मात

चेन्नईने गेल्या सामन्यात मुंबईवर 8 विकेट राखून विजय मिळवला होता. या विजयासह ते चांगल्या लयीत आले आहेत. वेगवान गोलंदाज अंकुश पंबोज हा संघासाठी हुकमी एक्का ठरत आहे. फिरकीपटू नूर अहमदही त्याला चांगली साथ देत आहे. संजू सॅमसनचा सूर काहीसा हरवलेला दिसत असला तरी ऋतुराज गायकवाड हा भन्नाट फॉर्मात आहे. ऋतुराजला कार्तिक शर्मा सुयोग्य साथ देताना दिसत आहे.

दिल्लीला विजयानंतर गुड न्यूज मिळणार

दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्सवर मात करत विजयाच्या वाटेवर परतला आहे. दिल्लीच्या संघात मिचेल स्टार्क दाखल झाल्यावर त्यांच्या गोलंदाजीला चांगला आकार मिळाला आहे. केएल राहुल हा भन्नाट फॉर्मात आहे आणि सातत्याने तो धावांचे डोंगर उभारत आहे. दिल्लीने जर हा सामना जिंकला तर त्यांना सहाव्या स्थानावर पोहोचण्याची सुवर्णसंधी असेल. दिल्लीचा संघ दोनशेची धावसंख्या सहज उभारू शकत असला तरी चेन्नई गोलंदाजीपुढे त्यांचा चांगलाच कस लागणार आहे.

महेंद्रसिंह धोनी यावेळी त्याच्या एखाद्या फिनिशिंग फटक्यामुळे नव्हे, तर वारंवारच्या अनुपस्थितीमुळे सर्वांचे ठोके वाढवतोय. चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली पॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यासाठी राजधानीत दाखल झाली, पण ‘पॅप्टन कूल’ मात्र दिसलाच नाही. पोटरीच्या दुखापतीने अजूनही त्याची साथ सोडलेली नसून त्याच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

या आयपीएलमध्ये धोनी एकही सामना खेळलेला नाही. मैदानावर त्याची सावलीही दिसलेली नाही. तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यावरच मैदानात उतरणार, अशी सावध भूमिका वारंवार संघव्यवस्थापन घेतेय. चेन्नई सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘तो कधीही उपलब्ध होऊ शकतो’ असे सांगून सर्वांना आशेचा किरण दाखवला, पण मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आम्ही कोणतीही घाई करण्याचे सांगून अजून थोडी प्रतीक्षा करा, असे संकेत दिले आहेत.

Comments are closed.