कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
मुंबई : नागरिकांना एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सूचित करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून व्हॉट्सअॅप क्रमांक 9769919221 जारी करण्यात आला आहे. रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी येथे दिली. विधान परिषद नियम 260 अन्वये चर्चेवर उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी सभागृहात राज्यातील एलपीजी पुरवठ्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच, गॅस साठेबाजी प्रकरणी 23 गुन्हे दाखल करून 18 जणांना अटक केली आहे. तर, कमर्शिअल गॅस वाटपाच्या सूचना दिल्या असून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना गॅस वाटप केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असून एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. इंधन उपलब्धतेबाबत योग्य ती माहिती दिली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई सुरू असून नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधातही जनजागृती केली जात आहे. रिफायनरीतील एलपीजी उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविले आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. हे दर केंद्र शासन ठरवते आणि त्यांनी सुमारे ₹60 ची वाढ केली आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की भारत सरकारकडून दर महिन्याला प्रति सिलेंडर ₹300 इतके अनुदान दिले जाते. तसेच, महाराष्ट्र शासनाकडूनही तीन सिलेंडर देण्याची योजना आहे. सध्याच्या परिस्थितीत ₹60 ची वाढ करण्यात आली आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता पथक (गॅस टंचाई)
काळाबाजाराच्या घटना घडू नये यासाठी आठ मार्च रोजीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत सध्या अशी कोणतीही वाढ झालेली नाही. भविष्यात वाढ होईल का याबाबत निश्चित सांगता येत नाही, पण वाढ होऊ नये, अशीच अपेक्षा असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच, सध्या 20 टक्के इथेनॉल मिश्रण लागू आहे. गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास कोळसा, रॉकेल यांसारख्या पर्यायी इंधनांचा विचार केला जात आहे. रॉकेल पुरवठ्याची साखळी सुरळीत करुन उपलब्ध केरोसिन डीलर्समार्फत पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गहू आणि डाळींच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. काही ठिकाणी ₹2-₹3 इतकी किरकोळ वाढ झाली आहे; मात्र ₹100 ची वाढ झाल्याचे चुकीचे आहे. या संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध असून ती आवश्यक असल्यास सादर करता येईल.
8 ते 10 दिवसांचा कालावधी लागेल
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे काही जहाजे अडवली गेली होती; मात्र काही जहाजे सोडण्यात आली असून ती मुंबईकांडला आणि कोची येथे पोहोचली आहेत. भारत सरकार रशिया, इराण आदी देशांकडून इंधन पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. गल्फ देशांतील हल्ल्यांमुळे काही प्रमाणात पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर तात्पुरती कमतरता जाणवू शकते. तथापि, परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी अपेक्षा आहे. जहाजे आल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत घरगुती गॅस, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने पुरवठा केला जात आहे. आवश्यकतेनुसार केरोसिन आणि इतर पर्यायही उपलब्ध करून दिले जात आहेत. काही मोठ्या हॉटेल्सना पर्यायी इंधन वापरणे अवघड जात असले तरी इतर रेस्टॉरंट्सनी कोळसा व केरोसिनचा वापर सुरू केला आहे. नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल यासाठी प्रशासन आणि संबंधित अधिकारी सतत प्रयत्नशील आहेत.
23 गुन्हे दाखल, 18 जणांना अटक (Gas shortage action)
राज्यात स्थापन केलेल्या दक्षता पथकांनी केलेल्या कार्यवाहीनुसार जानेवारी ते १५ मार्च, २०२६ पर्यंत केलेल्या तपासण्यांची संख्या-२१२९, जप्त माल/गॅस सिलेंडरची संख्या-१२०८, जप्त मालाचे मुल्य -३३६६४११, दाखल गुन्हे-२३, अटक व्यक्तींची संख्या १८ आहे. नागरिकांनी पेट्रोल डिझेल एलपीजी पुरवठ्याबाबत काळजी करू नये, असे शासनाचे आवाहन आहे. मध्य-पूर्व युद्धजन्य परिस्थितीपूर्वी व सध्याच्या खाद्यतेलाच्या किंमतीत फक्त सामान्य वाढ झाली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.