माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाला जीआय मानांकन; महाराष्ट्रात मानांकन मिळालेला पहिलाच प्रसाद, तिरुपतीच्या लाडूनंतर माहूर देशातील दुसरे
>> राज ठाकूर
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्रीने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे. भारतात यापूर्वी तिरुपती संस्थानच्या लाडूच्या प्रसादाला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा बहुमान मिळवणारा माहूरचा तांबूल हा देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद ठरला आहे.
माहूरगड श्री रेणुकामातेचा पानाचा विडा अर्थात तांबूल हा मुख्य प्रसाद आहे. पुरणावरणाच्या नैवेद्यानंतर देवीला तांबूल अर्पण केला जातो. ज्याठिकाणी देवीचे ठाणे आहे तेथे विशेषकरून विडा तांबूल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे. कित्येक वर्षांपासून तांबुलाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. केंद्र सरकारच्या चेत्रई येथील जिऑग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्रीने यासंदर्भातील प्रमाणपत्र नुकतेच जारी केले. हा ऐतिहासिक बहुमान मिळवून देण्यासाठी जीआय टॅगचे तज्ज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे यांनी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली. रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांचेही यासाठी महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
जीआय मानांकन मिळवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, संस्कृती, परंपरा याची समग्र माहिती खात्याने दिल्याने दिलासा मिळाला आहे. माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील तांबुलाला जीआय मानांकन द्यावी लागते. केवळ माहिती देऊन भागत नाही, तर जीआय मानांकनाच्या निकषात बसण्यासाठी इतरही अनेक गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. तीन वर्षांपासून तांबुलाला जीआय मानांकन मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. जीआय मानांकनामुळे आता माहूरचा तांबुल या नावाने कुठेही बनावट तांबूल विकता येणार नाही. यामुळे भाविकांची फसवणूक थांबेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे प्रा. डॉ. गणेश हिंगमिरे, भौगोलिक मानांकनतज्ज्ञ यांनी सांगितले.
तांबूलाची रंगीत कथा
विष्णुदास महाराज हे श्री रेणुकादेवीचे भक्त. एकदा देवीने स्वप्नात येऊन मला तांबुलाचा नैवेद्य दाखव, अशी आज्ञा केली. मातेने केलेली आज्ञा प्रमाण मानून विष्णुदास महाराजांनी तांबूल अर्पण केला. तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू असल्याचे तांबूल तयार करणारे अमोल गावंडे यांनी सांगितले.
सध्या माहूर गडावर अमोल गावंडे, पांडुरंग राठोड, विशाल चौधरी, संतोष परळकर, अनिल परळकर, अभिषेक परळकर आणि लवकुश जाधव ही सात कुटुंबे तांबूल तयार करतात. तांबुलात नागवेलीची पाने, कात, चुना, बडिशेप, सुपारी, लवंग, विलायची, जायफळ, जायपत्री, ओवा, धनाडाळ, अस्मानतारा, ज्येष्ठमध आदीचा वापर केला जातो. मंदिरात दररोज सकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा प्रसाद तयार करण्याचे काम अविरत सुरू असते. तांबुलाचे सेवन अन्नपचनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.
Comments are closed.