आलिशान कारमधून अवैध गुटखा तस्करी, कारवर भारत सरकार अन् भाजपचा झेंडा; नेमकं काय घडलं?
पालघर क्राईम न्यूज: महाराष्ट्रात गुटखा विक्री आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) कमालीचे ॲक्शन मोडवर आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम उघडल्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या धसक्यातूनच पोलिसांची आणि प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी गुटखा तस्करांनी एक अत्यंत धक्कादायक शक्कल लढवल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी थेट कारवर ‘भारत सरकार’ अशी पाटी आणि भाजपचा झेंडा तसेच कमळ चिन्हाचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तलासरी पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला होता. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारी एक संशयास्पद इनोव्हा (Innova) कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या आलिशान कारची झडती घेतली असता, पोलीसही चक्रावून गेले. कारमधून तब्बल 20 लाख 60 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला आहे.
Palghar Crime News: कारवर भाजपचे चिन्ह आणि ‘भारत सरकार’ची पाटी!
पोलिसांना चकवा देण्यासाठी या गुटखा तस्करांनी व्हीआयपी (VIP) स्टाईलचा वापर केला होता. या इनोव्हा कारच्या पुढे ‘भारत सरकार’ अशी अधिकृत वाटेल अशी पाटी लावण्यात आली होती, तर समोरच्या काचेवर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत ‘कमळ’ हे चिन्ह आणि पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता. जेणेकरून महामार्गावरील कोणत्याही तपासणी नाक्यावर गाडी अडवली जाणार नाही, असा तस्करांचा डाव होता. मात्र, पोलिसांनी हा डाव उधळून लावला.
Palghar Crime News: पुढील तपास गुन्हे शाखेकडे
सध्या तलासरी पोलिसांनी हा सर्व गुटखा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली आलिशान कार जप्त केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमागे नेमके कोण मोठे मासे आहेत, याचा पुढील तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. या कारवाईची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
Badlapur FDA Action: बदलापूरातही एफडीएची कारवाई
दरम्यान, बदलापूर पश्चिमेच्या बस डेपो परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दोन टपऱ्या सील केल्या आहेत. याच टपऱ्यात तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून पान टपऱ्यातून सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांची मदत घेऊन रात्री उशिरा एफडीएच्या पथकाने या टपऱ्या सील करून कारवाई केलीय. दरम्यान या कारवाईनंतर सध्या बदलापुरात गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Comments are closed.