शाळा, कॉलेजमध्ये पोलिसांचा व्हॉट्सअॅप ग्रुप; ड्रग्जचा विळखा रोखण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’
‘ड्रग्जमुक्त पुणे शहर’ साठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समन्वयाद्वारे अमली पदार्थ तस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त केले जाणार आहे. ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमांतर्गत समन्वयासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून, त्याद्वारे शैक्षणिक संस्था समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतील. त्यासोबतच वेळ पडल्यास पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः ही रस्त्यावर उतरून अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
स्वारगेटमधील गणेश कला क्रीडा मंचावर गुरुवारी (दि.१६) पुणे शहर पोलिसांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्ज तस्करांना इशारा दिला. यावेळी सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त संजय पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह कार्यक्रमाला शाळा महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थ व ई-सिगारेटच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यापाश्र्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ किंवा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित ठिकाणांवर विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आवश्यक पडल्यास स्वतः ही रस्त्यावर उतरून कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांमध्ये ई-सिगारेटच्या वाढत्या व्यसनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांकडे ई-सिगारेट आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, पालकांना माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कॅम्पस कनेक्ट उपक्रमांतर्गत, शाळा आणि महाविद्यालयांना केवळ नाममात्र पाठिंबा न देता, अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना सावध करण्यासाठी भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये आणि पोलिसांमध्ये थेट समन्वय राहावा यासाठी व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात येणार आहे. या गटांद्वारे शैक्षणिक संस्था त्यांच्या अडचणी पोलिसांपर्यंत पोहोचवणार आहेत. तसेच संबंधित उपक्रम हा केवळ अमली पदार्थांपुरती मर्यादित नसून, यात शिस्त, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि रस्ते सुरक्षेबाबत समावेश आहे.
पोलीस अधिकारी जाणार शाळा-महाविद्यालयांत
शाळा-महाविद्यालयांचे व्यवस्थापन यांना जोडणारे ‘व्हॉट्सअॅप ग्रुप्स’ तयार केले जातील. त्यामुळे स्थानिक समस्यांची माहिती त्वरित देता येईल. प्रामुख्याने अनावश्यक पत्रव्यवहार किंवा विलंब टाळून त्यावर उपाययोजना करता येतील. जनजागृतीसाठी आगामी काळात पोलीस अधिकारी पुण्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांत प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांसह त्यांचे हॉट्स्पॉटस पोलिसांच्या रडारवर आहेत. ड्रग्जबाबतीत पोलिसांचे ‘झीरो टॉलरन्स’ आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आम्ही तस्करांविरुद्ध कारवाई करीत आहोत. मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करतो की, त्यांनी अमली पदार्थांना नाही म्हणा. मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
Comments are closed.