नवीन शेवा गावात स्लॅब कोसळला; पती-पत्नीसह चिमुकला गंभीर जखमी
गाढ झोपेत असताना घराचा स्लॅब कोसळून पती-पत्नीसह चिमुकला जखमी झाल्याची धक्कादायक घटना नवीन शेवा गावात आज सकाळी घडली आहे. प्रीतम रावकर (३५), पत्नी नम्रता रावकर (३०) आणि आठ वर्षीय मुलगा गौरांश रावकर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उरण तालुक्यातील नवीन शेवा जेएनपीटी विस्थापित गावाचे बोकडवीरा गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले. या गावातील रहिवासी वामन म्हात्रे यांनी आपले घर प्रीतम रावकर यांना भाडेतत्त्वावर दिले होते. गेल्या सहा वर्षांपासून हे कुटुंब भाड्याने राहत होते. सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेले हे एकमजली घर आहे. या घरात लाकडी कड्यावर कोबा टाकून लाद्या बसविण्यात आल्या होत्या. छतावर सिमेंटचे पत्रे टाकले होते. सकाळी सहाच्या सुमारास रावकर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक कोबा आणि स्लॅब कोसळला. मोठा आवाज झाल्याने सर्वांचाच थरकाप उडाला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
ठीकठिकाणी फ्रॅक्चर
अंगावर स्लॅबचा मलबा पडल्याने आई-वडील आणि मुलगा जखमी झाला होता. स्थानिक जगजीवन भोईर यांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. यामध्ये गौरांश गंभीर जखमी झाला असून त्याला ठीकठिकाणी फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर जेएनपीटीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.
Comments are closed.