Nagpur news – रेल्वेच्या धडकेत 6 हरणांचा जागीच मृत्यू; कन्हान परिसरातील दुर्दैवी घटना
नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगर परिषद हद्दीत शनिवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कन्हान रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या तुकाराम नगरजवळ रेल्वे रुळ ओलांडताना वेगवान ट्रेनच्या धडकेत 6 हरणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4 ते 5 च्या सुमारास हरणांचा एक कळप या भागातून रेल्वे रूळ ओलांडत होता. याच दरम्यान तिथून जाणाऱ्या एका वेगवान रेल्वे गाडीने या कळपाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात 6 हरणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकार्यांनी मृत हरणांचा रीतसर पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. हे हरीण नेमके कुठल्या जंगलातून शहराच्या हद्दीत आणि रेल्वे रुळापर्यंत पोहोचले, याचा तपास सध्या वन विभागाकडून केला जात आहे.
Comments are closed.