आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; बहुचर्चित चिपळूण उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूण शहरातील आंबेडकर चौक ते पंचायत समितीपर्यंतच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या काँक्रीटीकरणासह स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, साफसफाई, फिनिशिंग, लायटिंग, डांबरीकरण, रंगकाम व आवश्यक भरावाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून डिसेंबरपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत परशुराम ते खेरशेत या मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला मात्र विविध अडथळ्यांमुळे विलंब झाला. काही महिन्यांपूर्वी आंबेडकर चौक येथे उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाच्या डिझाइनमध्ये बदल करून नव्या आराखड्यानुसार काम सुरू केले. सध्या उड्डाणपुलाचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले असून पुलावरील स्लॅबचे कामही पूर्णत्वास आले आहे. आज ठेकेदार कंपनीच्या सर्व अभियंत्यांनी एकत्रितपणे पुलाच्या स्लॅबची पाहणी करून उर्वरित कामांचा आढावा घेतला. अत्याधुनिक यंत्रसामग्री व क्रेनच्या साहाय्याने गर्डर बसविण्याचे काम यापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. अभियंते व कामगारांकडून उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या उड्डाणपुलाची लांबी सुमारे १.८१ किलोमीटर, तर रुंदी २५ मीटर आहे. आंबेडकर चौक येथील १३० मीटरच्या भागात आठ गर्डर असून उर्वरित गर्डर ४० मीटर लांबीचे आहेत. पुलासाठी एकूण १८२ खांब उभारण्यात आले आहेत. महामार्ग चौपदरी असला तरी भविष्यातील वाहतुकीचा विचार करून उड्डाणपूल सहापदरी बांधण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे मुख्य काम पूर्ण झाल्याने आंबेडकर चौक परिसरातील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र, पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी साफसफाई, फिनिशिंग, लायटिंग, डांबरीकरण, रंगकाम व भरावाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर चिपळूण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिपत्याखाली बीएमसी कंपनीकडून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Comments are closed.