चिपळूण वालोपे येथे भीषण अपघात; चिमुकलीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला , वाहतुकीची प्रचंड कोंडी
चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २४ मे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती .
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रविवारी रात्री सुमारे १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास होमगार्ड कर्मचारी कुणाल आग्रे हे पत्नी व चार वर्षीय मुलीसह प्रवास करत होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा चक्काचूर झाला आणि चार वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुणाल आग्रे आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. वारंवार होणारे अपघात, महामार्गावरील वाढता वेग आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांबाबत संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे दोन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . अनेक प्रवासी आणि वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला. आंदोलनकर्त्यांना विनंती करून अखेर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. याठिकाणी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून केला जात आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.