बेशिस्त कर्मचाऱ्यांना चाप लागणार, महासभेत प्रस्ताव; ओळखपत्र, डिजिटल नोंद सक्तीची

ठाणे पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना चाप लागणार आहे. यासाठी शुक्रवारी होणाऱ्या महासभेत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना गळ्यात ओळखपत्र आणि हजेरीची डिजिटल नोंद करणे बंधनकारक होणार आहे. या प्रस्तावाचा मुख्य उद्देश उशिरा येणाऱ्या तसेच कामावर हजर राहूनही जागेवरून ‘गायब’ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार आहे.

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात तसेच प्रभाग समित्यांमध्ये अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक यांना महापालिकेकडून अधिकृत आय कार्ड देण्यात आलेले नाही. तसेच महापालिकेत काही कंत्राटी कर्मचारीही कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी महापौरांचे वाहनचालक व एका पत्रकारामध्ये झालेल्या वादामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख महत्त्वाची ठरली. अशा घटनांमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाव, पदनाम, विभाग, छायाचित्र आणि ओळखपत्र क्रमांक असलेले आय कार्ड छापावे. तसेच कार्यालयात उपस्थित असताना ते गळ्यात घालणे बंधनकारक करावे, अशी सूचना नगरसेवक भरत चव्हाण यांनी प्रस्तावात केली आहे.

Comments are closed.