राजस्थानमध्ये CJP नेत्यांवर दगडफेक.

संघटनेचा आरोप, गावकऱ्यांचा संघटनेला विरोध

वृत्तसंस्था/जयपूर (राजस्थान)

राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर नजीकच्या एका खेड्यात कॉक्रोच जनता पार्टीचे काही नेते सरकारी शाळांच्या तपासणीसाठी गेले असताना, त्यांच्यावर दगडफेक झाली, असा आरोप या संघटनेने केला आहे. या संघटनेचे एक अधिकारी अशुतोष रांका हे आपल्या सहकाऱ्यांसह शाळा तपासण्यासाठी गेले होते. सरकारी शाळांमध्ये सोयी कितपत आहेत, याची तपासणी करणे, हा त्यांचा उद्देश होता. सीजेपी संघटनेने हे अभियान हाती घेतले आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे. तथापि, राजस्थानात संबंध नसलेल्या व्यक्तीकडून शाळा तपासणीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आपल्या संघटनेच्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा दावा या संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ‘एक्स’वर केला. संघटनेचे स्वयंसेवक शाळा तपासणीसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे लोक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. कन्वरपुरा खेड्यात हा प्रकार घडला, असा आरोप त्यांनी सोशल मिडियावर केला आहे.

खेड्यातील लोकांचाच विरोध

सीजेपीने भारतीय जनता पक्षावर आरोप केला असला, तरी कन्वरपुरा खेड्यातील लोकांचाच सीजेपीला विरोध असल्याचे दिसून येत आहे. आमच्या खेड्यातील शाळेसाठी राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 12 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. ही शाळा खेड्यातील लोकच विकसीत करणार आहेत. सीजेपीने यात मधे पडण्याचे कोणतेही कारण नाही. सरकारी अनुदानावर आम्ही आमच्या गावात यापूर्वी एका मंदिराचे निर्माणकार्य केले आहे. त्याच प्रमाणे आम्ही शाळेचा विकास करण्यासही सक्षम आहोत. बाहेरच्या लोकांनी येथे येऊन शाळा तपासणीच्या नावाखाली गोंधळ निर्माण करण्याचे कारण नाही. आम्हाला सीजेपीकडून कोणतेही सहकार्य किंवा साहाय्य नको आहे. सीजेपीचा उद्देश केवळ राजकीय आहे, असा आरोपही गावातील अनेक नागरीकांनी पत्रकारांसमोर केला.

सीजेपीची विचारसरणी देशविरोधी

सीजेपीचे नेते प्रभू रामचंद्रांच्या विरोधात वक्तव्य करतात. ते देश तोडण्याची आणि विभाजीत करण्याची भाषा करतात. अशा लोकांनी या गावात येऊन येथील शांतता बिघडवू नये. आम्ही या संघटनेच्या आणि तिच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. जे लोक या देशासाठी काम करण्याची इच्छा धरतात, असेच लोक आम्हाला हवे आहेत, असेही प्रतिपादन गावातील सर्वसामान्यांकडून होत आहे.

शाळा तपासणी करता येते का…

सरकारी शाळांची तपासणी करण्याचे अभियान सीजेपीने घोषित केले आहे. तथापि, सरकारी शाळा कोणाला तपासता येतात आणि कोणाला येत नाहीत, हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. संबंध नसलेल्या व्यक्तींना सरकारी शाळा सरकारच्या अनुमतीशिवाय तपासता येत नाहीत, असा नियम असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक शाळेला भेट देऊ शकतात. पण प्रत्येकाला हा अधिकार नाही, असेही प्रतिपादन या संदर्भात अनेकांनी केले आहे.

Comments are closed.