भैय्याजी जोशींच्या मराठीसंदर्भातील वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राजधानी मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वाद पेटला आहे. शिवसेनेसह विरोधकांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन तीव्र संताप व्यक्त करत सरकारला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका मांडताना भैय्याजी जोशी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भैय्याजी जोशी यांनी तामिळनाडू आणि गुजरातमध्ये जाऊन असं व्यक्तव्य करुन दाखवावं, असं आव्हान देखील या नेत्यांनी दिलं. तसेच, सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. विधानसभेत या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत येणाऱ्याला मराठी भाषा शिकलं पाहिजे असं नाही, असं वक्तव्य भैय्याजी यांनी केलं होतं.

भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन सर्वत्र गदारोळ उठल्यानंतर आणि विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं, त्यानंतर सरकारच्यावतीने भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे, महाराष्ट्रात येणाऱ्यांनी मराठी शिकलंच पाहिजे, असेही स्पष्ट केलं आहे. मी भैय्याजी जोशींचं वक्तव्य ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्ण ऐकून मी त्यावर बोलेन. पण, आमची, सरकारची भूमिका काय आहे तर, मुंबईची, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैय्याजींचं देखील काही दुमत असेल असे मला वाटत नाही, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

भाषावार प्रांतरचना झाली, आता गल्लीवार प्रांत रचना करत आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. शिवरायांबद्दल अवमानग्रस्त बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस असल्याचं म्हटलं. मग, आता भैय्याची जोशी चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन दाखवावं नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणाऱ्यावर कारवाई करुन दाखवावी. नाहीतर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे, अशा शब्दात ठाकरे कडाडल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा

एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अनाजीपंत म्हणत उद्धव ठाकरे कडाडले

अधिक पाहा..

Comments are closed.