मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मोठं यश मिळालं असून मुंबई) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, एकनाथ शिंदेंनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने आणखी या चर्चेला हवा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर मराठी (एकनाथ शिंदे) माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मात्र, तत्पूर्वी एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात आज गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर पोहचले असताना दुसरीकडे मुंबईचा महापौर कोण? याची चर्चा जोर धरत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीत उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेबाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. येथील केडीएमसी महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करण्याबाबत ही चर्चा झाली. तसेच, मुंबईसह एमएमआर रिजनमधील महापालिकांमध्येही सत्ता स्थापनेबाबत त्यांची चर्चा झाली. उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले होते, मात्र निकालानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असेच दिसून येते.

राज्यात सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतत भाजपला 51 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे, भाजप आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करणार आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात आहे, अशी चर्चा माध्यमांत आहे. यासंदर्भताही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत अंतिम निर्णय किंवा चर्चा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातच होईल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

आमची नाहक बदनामी – सावंत

महापालिका निवडणुका पार पडल्या, राज्यभरात शिवसेना 2 नंबरवर आहे. राज्यात 402 ठिकाणी आम्हाला विजय मिळाला आहे. मात्र, जे आमच्यावर आगपाखड करतात त्यांना केवळ 100 हून अधिक जागा मिळाल्या. आम्ही नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं त्यावरून उलट सुलट चर्चा सुरू आहेत. जे पूर्वी झालं तसं आम्ही करणार नाही, आम्ही युतीत निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, काही लोकं आमची नाहक बदनामी करत आहेत. पण, कोण नॉट रिचेबल आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी महायुतीचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेही वाचा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

आणखी वाचा

Comments are closed.