राज्यात मराठा-ओबीसी दंगली घडल्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार; जरांगेंनी सांगितला मुंबईचा प्लॅन

सातारा : मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी, मुंबईत 29 ऑगस्टला राज्यभरातून मराठा बांधवांना येण्याचं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं आहे. येत्या, 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार, आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अशा शब्दात जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्‍यांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फड्नाविस) हे ओबीसींसाठी लढणार असतील, तर ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत असाच त्याचा अर्थ होतो, असेही जरांगेंनी म्हटले.

मराठा समाजाच्या माध्यमातून 29 ऑगस्टला मुंबई चलो चा नारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज मराठा समाजातील बांधवांना भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी ते उपस्थित राहिले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार 29 ऑगस्टला मराठा आरक्षण कसे देत नाहीत, तेच मी पाहतो. मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण घेणार आणि 29 तारखेला आरक्षणाचा तुकडा पाडणार, असे जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.

मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार आहे, याचा मला आनंद होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केल्यानंतर मराठा समाजाची मोठी गर्दी मला भेटण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातून जर मोठ्या ताकतीने मराठा समाज येणार असेल तर मराठवाडा विदर्भ देखील त्याच ताकतीने येईल असा मला विश्वास आहे.

याचा अर्थ ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत

देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसीच्या हक्कासाठी लढणार. एकंदर बरे झाले, मराठ्यांची झोप जाईल. याचा अर्थ असाच होतो की, मी मराठ्यांसाठी लढणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी लढणार, याचा अर्थ मराठ्यांच्या गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला लढायचं नाही का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती जर ओबीसींसाठी लढणार असतील तर मराठ्यांसाठी लढणार नाही, असा याचा अर्थ होतो. मराठ्यांनो आता जागे व्हा. मराठ्यांच्या मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीनचीट भेटत नाही. त्यामुळे त्यांचेच नाव खराब होणार आहे, सर्वच पक्षातील मराठा नेते ते संपवायला निघाले आहेत, असं कधी होईल का. देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघाले आहेत, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं. भाजपसाठी ही वागणूक पूर्णपणे घातक आहे. त्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी मोठी पावर ॲक्शन कमिटी केली पाहिजे . कारण, देवेंद्र फडणवीस हे सर्वांना संपवणार आहेत, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

मराठा-ओबीसी दंगल घडल्यास मुख्यमंत्रीच जबाबदार

दरम्यान, मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू आहे. मात्र, आमच्यात असं होणार नाही. याउलट दोन्ही समाज एकत्र येऊन फडणवीस यांना अद्दल घडवतील. मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून सर्व ओबीसी बांधवांना गोव्याला बोलावले जाते आणि मराठ्यांच्या विरोधात कान भरले जातात. ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडली तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहतील, याचा फटका केंद्रातील सरकारला देखील बसणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

हेही वाचा

उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.