देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरातचा CDR कुठून आला, तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात (अशोक खरात) प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा असून अनेक राजकीय नेत्यांची नावे अशोक खरातसोबत जोडली जात आहेत. त्यातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचे कॉल डिटेल्स म्हणजेच सीडीआर शोधून काढले आहेत. त्यानंतर, त्यांच्यावर भाजपशी संलग्नित असल्याची टीका होऊ लागली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही थेट अंजली दमानियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावर, अंजली दमानिया यांच्याकडे सीडीआर कुठून आला, याचा तपास केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, आता अंजली दमानियांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, मी आज रात्री मुंबईत परत येत आहे. माझी या लोकांना विनंती आहे की उद्या सकाळी 10 वाजता माझ्या घरी चहाला या, असे म्हणत अंजली दमानियांनी सुषमा अंधारे, संजय राऊत आणि शशिकांत शिंदे यांना चहाचे निमंत्रण दिले आहेत. तसेच, मला अशोक खराचे सीडीआर (कॉल डिटेल्स) कसे मिळाले याचे प्रात्यक्षिकही मी करुन दाखवणार असल्याचे दमानियांनी म्हटलं आहे.
मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा. मी Claude हे AI वापरून त्यावर नंबर कसे शोधले त्याचे प्रात्यक्षिक दाखवते, तो खरा कसा आहे हे मी कसे चेक केले तेही पाहा. इतकेच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल, ते तुमच्यासमोर शोधून, त्यात इनकमिंग, आऊटगोईंग आणि कॉल समरी कशी येते, ते तुम्ही पाहा, असेही दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे.
सुषमा अंधारे, संजय राऊत आणि शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण आहे. मात्र, ह्यानंतर, खरात या विषयावर चर्चा करा आणि हो, मी ही माहिती द्यायला पोलीस महासंचालकांकडे वेळ मागितली आहे. ते उद्या भेटेल तर त्यांनाही माहिती देणार आहे, असेही दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट करुन सांगितलंय.
सीडीआर संदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री (Devendra Fadnavis on CDR)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा सीडीआर जाहीर करून त्याला कोणत्या नेत्याचे किती कॉल आले याची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्याकडे हा सीडीआर कुठून आला असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणाला नाही. जे या प्रकरणाचा तपास करत आहेत अशा तपास यंत्रणांनाच तो सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा सीडीआर कसा बाहेर आला, तो कुठून मिळवला याची चौकशी केली जाणार आहे. अशोक खरात प्रकरणात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.”
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.