ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी निदर्शने केली.
दिल्ली, उत्तर प्रदेशात जोरदार निदर्शने : आग्रा येथील निवासाबाहेर गोंधळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मोर्चे काढण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करताना ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जे. पी. न•ा यांनी काँग्रेसवर टीका केली.
दिल्लीत युवक काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करत निषेध मोर्चाही काढला. दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता अडवला होता, परंतु कार्यकर्त्यांनी जंतर-मंतर रोडवर मोर्चा काढला. दिल्लीसोबतच उत्तर प्रदेशातही निदर्शने झाली. उन्नावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मोरादाबादमध्ये ज्ञानेश कुमार यांचा पुतळा जाळण्यात आला. राजस्थानातही जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकापासून निवडणूक आयोगाच्या राज्य कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आणि पाण्याचे फवारे मारून निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.
जे. पी. नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी इंस्टाग्रामवर ‘देशाच्या प्रगतीमुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडी निराश झाली आहे. त्यांचे खोटे आरोप तथ्यांच्या कसोटीवर वारंवार उघडकीस आले आहेत. जेव्हा त्यांच्याकडे धोरण किंवा दूरदृष्टी नसते, तेव्हा ते संभ्रम आणि अराजकता पसरवण्याचा मार्ग अवलंबतात, असे म्हटले आहे. ‘निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांमागील तथ्ये स्पष्ट केली आहेत, तरीही विरोधी पक्षांकडून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. जनतेला विरोधी पक्षाचे नकारात्मक राजकारण आणि दुटप्पीपणा समजला असल्याचा दावाही नड्डा यांनी केला.
आगऱ्यातील निवासाच्या गेटवर अपमानास्पद शब्द
आग्रा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानी गेटवर काळे फासले. तसेच ‘ज्ञानेश कुमार गद्दार, मतचोर’ असा मजकूर लिहिला. हे निवासस्थान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे वडील डॉ. सुबोध कुमार गुप्ता यांचे आहे. गुप्ता यांनी अपमानास्पद शब्द लिहिण्याचे हे कृत्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच या संपूर्ण घटनेसंदर्भात आपण पोलिसात एफआयआर नोंदवून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचेही सांगितले. आता त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Comments are closed.