22 वर्षीय खेळाडूने शतक ठोकत रचला इतिहास, ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला

आयपीएल 2026 मधील 49व्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा 33 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबद संघाने 20 षटकांत 235 धावांचा मोठा स्कोर उभारला.

प्रत्युत्तरात पंजाब किंग्सचा संघ 20 षटकांत 202 धावांपर्यंतच पोहोचू शकला. पराभव झाला असला तरी पंजाबसाठी 22 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाज कूपर कोनोली याने खेळलेली नाबाद 107 धावांची शतकी खेळी चर्चेचा विषय ठरली. आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक झळकावत कोनोलीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात शतक करणारा विदेशी खेळाडू बनण्याचा मान त्याने मिळवला.

यापूर्वी हा विक्रम क्विंटन डी कॉकच्या नावावर होता. डी कॉकने 2016 मध्ये 23 वर्ष 122 दिवसांच्या वयात शतक झळकावले होते. मात्र कूपर कोनोलीने 22 वर्ष 257 दिवसांच्या वयात ही कामगिरी करत त्याचा 10 वर्ष जुना विक्रम मोडला.

आयपीएलमध्ये शतक ठोकणारे सर्वात युवा विदेशी खेळाडू

22 वर्षे 257 दिवस – कूपर कॉनोली*
23 वर्षे 122 दिवस – क्विंटन डी कॉक
23 वर्षे 153 दिवस – डेव्हिड वॉर्नर
23 वर्षे 330 दिवस – डेव्हिड मिलर
23 वर्षे 352 दिवस – कॅमेरून ग्रीन

आयपीएल मध्ये सर्वात कमी वयात शतक करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीत आता कूपर कोनोली अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यानंतर क्विंटन डी कॉक, डेव्हिड वॉर्नर, डेव्हिड मिलर आणि कॅमेरून ग्रीन यांचा क्रमांक लागतो.

यासोबतच कूपर कोनोलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. पंजाब किंग्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर गेला आहे. यापूर्वी ख्रिस गेलने 2018 मध्ये नाबाद 104 धावांची खेळी केली होती. मात्र कोनोलीने 107 धावांची नाबाद खेळी करत हा विक्रम मोडीत काढला.

Comments are closed.