SRHvsPBKS: “मला सामनावीर पुरस्कार का मिळाला?”, पॅट कमिन्सने व्यक्त केले आश्चर्य
आयपीएल २०२६ मध्ये ४९ वा सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. हैद्राबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. मागील १२ वर्षांपासून विजयाच्या शोधात असलेल्या पंजाबचा हैद्राबादमध्ये ३३ धावांनी पराभव झाला, जो त्यांचा येथिल सलग नववा पराभव ठरला आहे. या सामन्यानंतर हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, ज्याचे त्यालाही आश्चर्य वाटले. त्याने आपल्याला सामनावीर पुरस्कार का दिला गेला हा प्रश्न त्याने उपस्थित केला.
सामन्यामधील काही खेळाडूंची कामगिरी पाहिली, तर ते ही सामनावीर पुरस्कारासाठी पात्र होते. हा पुरस्कार हैद्राबादसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या हेनरिक क्लासेन (६९) आणि १३ चेंडूंत नाबाद २९ धावा करत गोलंदाजी करताना २ षटकांत ११ धावा देत एक विकेट घेणारा नितीश कुमार रेड्डीलाही दिला जाऊ शकला असता. रेड्डीने फॉर्ममध्ये असलेल्या प्रभसिमरन सिंगची विकेट घेतली होती आणि एक झेलही पकडला होता.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर कमिन्सने आश्चर्य व्यक्त करताना म्हटले, मला तो पुरस्कार कसा मिळाला, हे मला अजूनही माहित नाही; पण मला खूप छान वाटत आहे.
कमिन्सने या सामन्यात कोणती कामगिरी केली, ज्यामुळे तो सामनावीराचा मानकरी ठरला हे जाणून घेऊ. त्याने प्रथम गोलंदाजीत ४ षटकांत ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने पंजाबचा लयीत असलेला सलामीवीर प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोलीसोबत धोकादायक भागीदारी करणाऱ्या सूर्यांश शेडगे यांची विकेट घेतली होती. सूर्यांशने कूपरसोबत पाचव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली होती.
कमिन्सने गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणही उत्तम केले. त्याने प्रभसिमरन आणि पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर यांचे झेल घेतले. क्रिकेटमध्ये झेल घेणे म्हणजे सामन्याचे निकाल पालटणारे क्षण ठरते. त्यामुळेच कमिन्स हाच सामनावीर पुरस्कारासाठी पात्र होता, हे सिद्ध होते.
आयपीएल २०२६ मध्ये हैद्राबादची कामगिरी पाहिली तर ते या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहेत. त्यांनी पहिल्या चार सामन्यांमध्ये केवळ एकच विजय मिळवला होता. आता त्यांनी खेळलेल्या ७ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांच्या या विजयामध्ये प्रत्येकी वेळी वेगवेगळ्या खेळाडूंनी विशेष कामगिरी करत सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत.
हैद्राबादच्या पहिल्या विजया रेड्डी, दुसऱ्या विजयात प्रफुल्ल हिंगे, तिसऱ्या विजयात इशान मलिंगा, चौथ्या विजयात अभिषेक शर्मा, पाचव्या विजयात मलिंगा आणि सहाव्या विजयात क्लासेन हे सामनावीर ठरले आहेत.
Comments are closed.